Food Adulteration Drive pudhari photo
कोल्हापूर

Food Adulteration | ६ पेढ्यांची दुकाने सील; १ लाख २० हजारांचा दंड

शिरोळ तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने शिरोळ तालुक्यात अन्न भेसळ करणाऱ्या व बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. एप्रिल २०२६ पासून आजतागायत तालुक्यात विविध ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांचे अन्न नमुने जप्त करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाकडून कारवाई झालेल्या संबंधित आस्थापनांची व मालकांची नावे अधिकृतपणे जाहीर केली जात नसल्याने उलटसुलट चर्चा रंगली आहे.

शिरोळ तालुक्यातील एकूण ८ महत्त्वाच्या ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. यात खवा, तूप, मिल्क पावडर, पेढे, रबडी, बासुंदी व खाद्यतेल यांसारख्या दैनंदिन वापरातील ३० विविध अन्नपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिबंधित अन्न पदार्थांवर कडक कारवाई केली आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या तब्बल ६ पेढ्यांची दुकाने सील केली आहेत. तसेच, नोंदणीधारक अन्न आस्थापनांची तपासणी केली असता, त्यात अनेक त्रुटी आणि बेकायदेशीर बाबी आढळून आल्या आहेत. या कारवाई झालेल्या दुकानांची, हॉटेल्सची अथवा पेढ्यांच्या दुकानदारांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवली आहेत.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे असुरक्षित अन्नपदार्थ नेमके कुठे विकले जात होते? कोणाकडून दंड वसूल करण्यात आला? आणि सील केलेल्या ६ पेढ्या नक्की कोणाच्या आहेत? याची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाने प्रसिद्ध केलेली नाही. दरम्यान, नावे न देण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यु.सी.लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्हाला ही नावे देता येत नाहीत. याबाबत वरिष्ठांशी अभिप्राय घेऊन आपणास कळवत असल्याचे त्यांनी सांगितले.

तुपाचे ३ नमुने असुरक्षित...

एप्रिल २०२६ पासून आजपर्यंत अन्न नमुने ३०, अन्न पदार्थ जप्ती धाडी ८, यात खवा, तूप, मिल्क पावडर, रबडी बासुंदी, तेल यांचा समावेश आहे. तीन ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ कारवाई करून ६ पेढ्या सील केल्या. नोंदणीधारक अन्न आस्थापना तपासणीप्रकरणी १ लाख २० हजार रुपये दंड वसूल काण्यात करण्यात आला. तसेच ३ तुपाची नमुने असुरक्षित आढळून आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT