Hingangaon murder case | हिंगणगावात वडिलासह भावाचा निर्घृण खून; संशयित स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर 
कोल्हापूर

Hingangaon murder case | हिंगणगावात वडिलासह भावाचा निर्घृण खून; संशयित स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

जमिनीच्या वादातून घटना

पुढारी वृत्तसेवा

हातकणंगले : जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर भीषण रक्तरंजित घटनेत झाले आहे. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे रविवारी दुपारी मोठ्या मुलाने वडिलांसह धाकट्या भावाचा कुर्‍हाड आणि खोर्‍याने डोक्यात वार करून निर्घृण खून केला. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली असून, संशयित स्वतःहून पोलिसांत हजर झाला आहे.

मारुती बंडू कुंडले (वय 65) आणि शीतल मारुती कुंडले (वय 44) अशी मृतांची नावे आहेत. तर संभाजी मारुती कुंडले (वय 46) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंगणगावनजीक असलेल्या गट नंबर 484 मधील शेतात मारुती कुंडले आणि त्यांचा लहान मुलगा शीतल हे दुपारी कामात व्यस्त होते. यावेळी संभाजी तिथे आला. जमिनीच्या वाटणीवरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात संभाजीने कुर्‍हाड आणि खोर्‍याने वडील व भावाच्या डोक्यात वर्मी घाव घातले. हा हल्ला इतका भीषण होता की, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संभाजी कुंडले पळून न जाता थेट हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाला. आपण वडील आणि भावाचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली, तेव्हा पोलिस अधिकारीही चक्रावून गेले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, घराच्या पाठीमागे दोघांचे मृतदेह आढळून आले. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहेत.

परिसरात भीतीचे वातावरण

खुनाची बातमी वार्‍यासारखी हिंगणगाव आणि कुंभोज परिसरात पसरली, ज्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

जुना वाद अन् पोलिसांकडे तक्रारी

कुंडले कुटुंबामध्ये जमिनीच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद होता. यापूर्वीही त्यांच्यात भांडणे झाली होती आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. स्थानिक नेते आणि पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वीच संभाजीने वडिलांच्या डोक्यात ‘पार’ घालून त्यांना जखमी केल्याची माहितीही समोर आली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पाहणी

घटनेची माहिती मिळताच डी.वाय.एस.पी. अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे आणि सहायक पोलिस निरीक्षक यादव मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT