kolhapur | कात्यायनी खोऱ्यातील ‘छमछम’ थांबणार कधी? 
कोल्हापूर

kolhapur | कात्यायनी खोऱ्यातील ‘छमछम’ थांबणार कधी?

पार्ट्या, जुगार, सेक्स रॅकेटमुळे पोलिसांसमोर नवे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पवन मोहिते

कसबा बावडा : धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांत घालवण्यासाठी शहरापासून दूर, निसर्गरम्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या फार्म हाऊसना आता व्यावसायिक स्वरूप येऊ लागले आहे. कोल्हापूर शहरालगतच्या कात्यायनी, कळंबा, वाशी, तामगाव, नंदगाव, दिंडनेर्ली परिसरासह जिल्ह्यातील विविध भागांत फार्म हाऊसची संख्या वाढत आहे; मात्र काही ठिकाणी या फार्म हाऊसचा वापर पार्ट्या, मद्यपान, जुगार तसेच अन्य कथित अवैध प्रकारांसाठी होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लॉकडाऊननंतर फार्म हाऊस भाड्याने देण्याचा व्यवसाय वाढला. दिवसाला पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत भाडे मिळत असल्याने या व्यवसायात स्पर्धा वाढली. काही ठिकाणी ग्राहकांची पुरेशी चौकशी न करताच फार्म हाऊस भाड्याने दिली जात असल्याची चर्चा आहे. निर्जन ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसमुळे गैरप्रकार करणाऱ्यांना मोकळे रान मिळत असल्याचेही पोलिसांच्या कारवायांतून समोर आले आहे.

अलीकडेच दिंडनेर्ली येथील ‘व्ही फार्म’वर पोलिसांनी छापा टाकून दहा पुरुष व चार महिलांना ताब्यात घेतले. विनापरवाना स्पीकरवर गाण्यांच्या तालावर नृत्य, मद्यपान आणि अश्लील हावभाव केल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली. यापूर्वी कळंबा येथील फार्म हाऊसवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. जैताळ फाट्याजवळील फार्म हाऊसवर जुगार खेळणाऱ्या सात जणांवर इस्पुर्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच एकोंडी (ता. कागल) येथील फार्म हाऊसवरील पार्टीप्रकरणी कागल पोलिसांनी कारवाई केली होती.

मालकांचीही जबाबदारी

फार्म हाऊसवर गैरकृत्य होऊ नये, याची मालकांनी दक्षता घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रातील फार्म हाऊसवर कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित मालकांसह गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

फार्म हाऊसची वाढती संख्या आणि त्यांचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी नियमित तपासणी, मालकांची जबाबदारी निश्चिती आणि भाडेकरूंची पडताळणी कधी होणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT