कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग समर्थनासाठी शेतकरी बांधव सात-बारा उतार्‍यासह जिल्हाधिकारी कार्यालयात आले. Pudhari File Photo
कोल्हापूर

Shaktipeeth Highway | आमची जमीन घ्या; पण शक्तिपीठ महामार्ग कराच

आ. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांकडे सात-बारा उतारे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जमिनीसाठी सहापट मोबदला आणि समर्थन देणार्‍या शेतकर्‍यांना 50 टक्के बोनस रक्कम द्या. आमची जमीन घ्या; पण शक्तिपीठ महामार्ग कराच... असे म्हणत शक्तिपीठ द्रुतगती महामार्गात बाधित होणार्‍या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शनिवारी सात-बारा उतारे दिले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील सुमारे शंभरहून अधिक शेतकर्‍यांचा यात समावेश होता.

शक्तिपीठ महामार्गाला गती, महाराष्ट्र राज्याची उन्नती...

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार क्षीरसागर आले. त्यानंतर काही वेळातच सुमारे शंभरहून जास्त शक्तिपीठ महामार्गात जमीन बाधित होणारे शेतकरी आले. गेटपासूनच घोषणा देत ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अनेकांच्या हातात शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे... शक्तिपीठ महामार्गाला गती, महाराष्ट्र राज्याची उन्नती... अशी वाक्ये लिहिलेले फलक होते. तर, बहुतांश शेतकर्‍यांनी हातात आपापल्या शेतजमिनीचे सात-बारा उतारे धरले होते. यात महिलाही सहभागी होत्या.

शेतकर्‍यांना दळणवळणासाठी मार्ग

शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचे अध्यक्ष प्रा. दौलतराव जाधव यांनी विरोधक शक्तिपीठचे राजकारण करत आहेत, असा आरोप करून म्हणाले, जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही जमिनी देत आहोत. शक्तिपीठ झाला की, धार्मिक पर्यटन वाढेल, शेतकर्‍यांना दळणवळणासाठी मार्ग उपलब्ध होईल. भुदरगडसारख्या विकासापासून वंचित असलेल्या तालुक्याचा विकास होईल. शासनानेही बाधित जमिनीला प्रचलित दरापेक्षा जास्त दर द्यावा.

...अन्यथा कोल्हापूर विकासापासून वंचित

माजी महापौर राजू शिंगाडे यांनी, विरोधक शक्तिपीठला कोल्हापुरातून विरोध असल्याचे भासवत आहेत. परंतु, सध्याची शेतकर्‍यांची गर्दी पाहता विरोधकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. शक्तिपीठ महामार्गाला साथ दिली नाही, तर कोल्हापूर विकासापासून वंचित राहील, असे सांगितले. शिरोळचे सचिन लंबे म्हणाले, कोथळीतील 45 शेतकर्‍यांची जमीन जात असून, त्यापैकी 41 जण, दानोळीतील 90 पैकी 80, निमशिरगावमधील 80 टक्के शेतकरी पाठीशी आहेत. शासनाने योग्य मोबदला दिला, तर सर्वच शेतकरी समर्थनार्थ रस्त्यावर उतरतील. तसेच, महामार्गाच्या मोजणीची सुरुवात शिरोळमधूनच करू, असे सांगितले.

यावेळी सतीश माणगावे, वसंत पिसे, चंद्रकांत माने, वासंती हराळे, रुक्मिणी माने, नीता पाटील, सविता माने, रुचिला बांदार, नवनाथ पाटील, आनंदा धनगर, भीमराव कोतकर, अमोल मगदूम, धनपाल आळते, अनिल पाटील, रोहित बांदार, राजू जमादार, प्रभागर हेरवाडे, विजय हवालदार, सूर्यकांत चव्हाण, राम अकोलकर, मेघन पंडित, दत्ता पाटील, जयसिंग पाटील, सुरेश पाटील आदीसह इतरांनी जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे सात-बारा उतारे दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT