कोल्हापूर : मान्सूनपूर्व पावसामध्ये झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झालेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून या कामासाठी पैशाची जुळवाजुळव करताना त्याची दमछाक होत आहे. अशा स्थितीत शेतकर्यांची थकलेली एफआरपीदेखील देण्याचे नाव साखर कारखाने घेईनात. त्यामुळे शेतकर्यांची फरफट सुरू आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांकडे 72 कोटी 63 लाख 73 रुपये शेतकर्यांचे थकीत असून ही रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी होत आहे.
ऊस उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या उसाच्या बिलासाठी कायदा करूनही प्रतीक्षा करावी लागते. त्यासाठी आंदोलन करावे लागते. ही वेळ शेतकर्यांवर येऊ नये म्हणून एफआरपीचा कायदा करण्यात आला, तरीदेखील शेतकर्याला त्याच्या उसाचे बिल वेळेत मिळत नाही. गेल्या गळीत हंगामात शेतकर्यांनी घातलेल्या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम अद्याप कोल्हापूर विभागातील सोळा साखर कारखान्यांनी दिलेली नाही.
मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाची तयारी सुरू असतानाच पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी खरिपाची तयारी झालेली आहे. बी-बियाणे, खते, औषधे यासाठी शेतकर्याला आता पैशाची गरज असताना शेतकर्यांकडे मात्र हातात सध्या काहीच नाही.
एफआरपीची रक्कम मिळेल असे वाटत होते; परंतु अजूनही ती मिळालेली नाही. थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांमध्ये यावर्षी दरात अग्रेसर आणि साखर उद्योगात नाव असलेल्या काही साखर कारखान्यांचा समावेश आहे. पैसे नसल्यामुळे शेतकरी सावकारीकडे वळू लागला आहे.
एफआरपी वेळेवर देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट आदेश दिले असतानाही कारखान्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बहुतांश साखर कारखानदार सत्तेत असल्यामुळे कारवाईसाठी त्यांच्या दारातदेखील कारखान्याची यंत्रणा जाऊ शकत नाही. ऊस दिला; परंतु बिल न मिळाल्याने शेती करायची कशी, असा सवाल शेतकर्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
एफआरपी थकीत असलेल्या कारखान्यांमध्ये सहकारी आणि खासगी दोन्ही कारखाने आहेत. 16 साखर कारखान्यांपैकी अकरा साखर कारखाने सहकारी आहेत व पाच साखर कारखाने खासगी आहेत.
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना........................195.66
भोगावती सहकारी साखर कारखाना................................ 569.29
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना........................68.20
छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल................... 59.32
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना................................868
पद्मश्री डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना...............539.91
दालमिया भरत शुगर, आसुर्ले-पोर्ले................................ 719.76
गुरुदत्त शुगर, टाकळीवाडी.............................................. 53.86
इको केन एनर्जी लिमिटेड, म्हाळुंगे खालसा, चंदगड............ 540.49
ओलम ग्लोबल अॅग्रो इंडिया, राजगोळी, चंदगड..................579.82
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना................370.41
हुतात्मा सहकारी साखर कारखाना..................................772.28
राजारामबापू सहकारी साखर कारखाना, साखराळे..............945.65
राजारामबापू सहकारी साखर कारखाना, वाटेगाव................496.53
दालमिया भारत शुगर, कोकरूड.......................................35.57
राजारामबापू साखर कारखाना, करंदवाडी..........................448.98