कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी शनिवारी राजीनामा दिला. कार्यकारी संचालक समीर नाळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. संचालक मंडळाच्या 29 मे रोजी होणार्या बैठकीमध्ये राजीनामा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. राजीनामा मंजुरीनंतर तो जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविला जाईल. यानंतर जिल्हा उपनिबंधक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर करतील.
शेतकरी संघात सर्वपक्षीय आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला एक वर्ष अध्यक्षपद दिले आहे. पहिली संधी राष्ट्रवादीला दिली, त्यानंतर जनसुराज्यला संधी मिळाली. जनसुराज्यचे बाबासाहेब शिंदे यांची मुदत संपल्याने त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शिंदे यांनी शनिवारी कार्यकारी संचालकांकडे राजीनामा सादर केला. आता नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लक्ष असणार आहे.
भाजप, काँग्रेसमध्ये कोणाला मिळणार संधी
अध्यक्षपदासाठी आता भाजप व काँग्रेसमध्ये चढाओढ असणार आहे. संघात भाजपचे चार तर काँग्रेसचे तीन संचालक आहेत. भाजपकडून अॅड. दत्तात्रय राणे आणि अजितसिंह मोहिते तर काँग्रेसकडून दत्ताजी वारके, आनंदा बनकर अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार आणि संबंधित पक्षाचे नेते कोणाला संधी देणार हे लवकरच स्पष्ट होईल.