कोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्या पीक तसेच शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. पंचनाम्यात एक रकाना हा क्रमांक नोंदवण्यासाठी राखीव ठेवला जाणार आहे. यामुळे शेतकर्यांना भरपाईसाठी हे ओळखपत्र आवश्यक होणार आहे.
केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत राज्यात सर्व शेतकर्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकर्यांना मिळण्यासाठी दि. 15 एप्रिलपासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) या योजनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. हा क्रमांक नसल्यास या योजनांचा लाभ दिला जाणार नाही.
आता हे ओळखपत्र मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्या शेती पीक तसेच शेत जमिनीच्या नुकसानीसाठी देण्यात येणार्या मदतीसाठी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 15 जुलै 2025 पासून हे ओळखपत्र पंचनाम्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
शेती पीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) साठी ठेवण्यात येणार आहे. तसेच शेती पीक नुकसान मदत वाटपाच्या डीबीटी प्रणालीमध्येही एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) साठी तयार करुन त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) भरण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने ई-पंचनामा राज्यात सुरू करताना त्या पंचनाम्यात शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक केल्याने तो नसल्यास पीक नुकसान मिळणार नाही, हे स्पष्ट झाले.