kolhapur | शेतकरी कुटुंबातील मुलाची ‘एआय’ झेप Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | शेतकरी कुटुंबातील मुलाची ‘एआय’ झेप

‘सिफ्रा एआय’ने केले डेटा सायन्स सोपे; प्रकल्पाला मिळाली कॉपीराईट मान्यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाल येथे शेतकरी कुटंबात जन्मलेल्या संकेत सर्जेराव पाटील या तरुणाने कृत्रिम बुद्धिमत्ता (अख) क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. संकेतने जगातील पहिले स्वयंचलित डेटा सायंटिस्ट टूल ‘सिफ्रा एआय’ विकसित केले आहे.

हे अभिनव टूल सामान्य लोकांसाठी डेटा सायन्सचे गुंतागुंतीचे काम अत्यंत सोपे बनवते. ‘सिफ्रा एआय’ हे एआय आणि मशिन लर्निंगवर आधारित आहे, जे डेटा विश्लेषण, व्हिज्युअलायझेशन आणि मशिन लर्निंग मॉडेलची निर्मिती आपोआप करते. या कामांसाठी आवश्यक असलेल्या प्रोग्रामिंग आणि तांत्रिक कौशल्यांची गरज यामुळे संपुष्टात येते. वापरकर्ते फक्त नैसर्गिक भाषेत (उदा. मराठी किंवा इंग्रजी) प्रश्न विचारून थेट उत्तरे, आलेख आणि भविष्यातील अंदाज मिळवू शकतात.

संकेतने आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासोबत केलेल्या संशोधनाचे हे फलित आहे. त्याच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली आहे. ‘सिफ्रा एआय’चा संशोधन प्रबंध गुगलवर प्रकाशित झाला आहे, तसेच भारत सरकारने या प्रकल्पाला कॉपीराईट मान्यता दिली आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या स्टार्टअप फाऊंडर हब प्रोग्रामनेही या टूलला अधिकृत पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे ‘सिफ्रा एआय’ला जागतिक ओळख मिळाली आहे.

संकेत हा कोल्हापुरातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिकत आहे. नोकरी करण्याऐवजी स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याचा संकेतचा मानस आहे. त्याच दिशेने पहिले पाऊल म्हणून ‘सिफ्रा एआय’ हे टूल लवकरच गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध होणार आहे. यामुळे हे तंत्रज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि डेटावर आधारित निर्णय घेणे अधिक सोपे होईल.

कुणासाठी उपयुक्त?

हे टूल विद्यार्थी, संशोधक, उद्योजक, शिक्षक, डेटा सायंटिस्ट आणि व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT