कोल्हापूर : शेतकर्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण कधी करायची हे ठरले नव्हते. कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय जाहीर करतील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुश्रीफ यांनी शुक्रवारी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मुश्रीफ पुढे म्हणाले, शेतकर्यांची कर्जमाफी आणि अतिवृष्टीने मराठवाड्यात आलेल्या महापुराने झालेल्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी होत आहे. मदतीसाठी निर्णायक पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या अपेक्षा केंद्र व राज्य सरकार पूर्ण करेल. संजय राऊत यांच्याबद्दल न बोललेले बरे. राऊत, सुप्रिया सुळे किंवा वडेट्टीवार विरोधी पक्षाचे असल्याने सरकारवर टीका करणे, सरकारला पेचात पकडणे हे त्यांचे कामच आहे. परंतु शेतकर्यांना मदत करून त्यांचे समाधान करणे हे सरकारचे काम आहे. ते आम्ही करतोय. विरोधी पक्षाचे काही लोक गर्दीमध्ये घुसून काहीतरी वक्तव्य करत असतात. अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न याच माध्यमातून केला जातो. पण पवार यांच्या मनामध्ये काहीही नसते. यामधून वेगळा अर्थ काढू नका, असेही मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कसलाही संबंध नाही. त्यांचा संबध जोडणे चुकीचे आहे. पडळकरांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकवेळा सल्ला दिला आहे. असे असताना पडळकर विरोधातील मोर्चात मुख्यमंत्र्यांवर टीका होत असले तर भाजपला राग येणे स्वाभाविकच आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. जिल्हाधिकारी चुकीचे वागत असतील तर त्याची दखल मुख्यमंत्री फडणवीस नक्की घेतील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.