कोल्हापूर : १) पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या कृत्रिम कुंडात दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. २) दीड दिवसाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी इराणी खण येथे तराफा व्यवस्था करण्यात आली होती.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Ganpati Visarjan | ‘मोरया’च्या गजरात दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

‘मोरया’च्या गजरात दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत मंगळवारी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध भागांत २४ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. चार विभागीय कार्यालयांच्या अखत्यारीत एकूण ४५७ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. काही नागरिकांनी बादलीत मूर्ती विसर्जन करून झाडांना पाणी दिले. घरगुती मूर्तिदान आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

काही कुटुंबांमध्ये दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी सकाळपासूनच घराघरांत लगबग सुरू होती. विधिवत पूजा, आरती आणि नैवेद्य दाखवून गणरायाला निरोप देण्यात आला. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि फुलांची व चुरमुऱ्यांची उधळण करत मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आल्या. इराणी खण येथे दुपारी चारनंतर विसर्जनासाठी भाविकांची गर्दी वाढली. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेतर्फे तराफा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. काही नागरिकांनी मात्र पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जित केल्याचे दिसून आले.

शहरातील २४ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था

महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध ठिकाणी २४ कृत्रिम विसर्जन कुंड उपलब्ध करून दिले होते. यामध्ये इराणी खण, तांबट कमान, जरगनगर कमान, फुलेवाडी फायर स्टेशन, तोरस्कर चौक, जामदार क्लब, गंगावेस , जुना बुधवार तालीम, राजारामपुरी परिसर, शिवाजी पेठ, साळोखे चौक, राजेंद्रनगर, रुईकर कॉलनी, बापट कॅम्प, कसबा बावडा, रमणमळा व सासने ग्राऊंड यासह २४ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT