कोल्हापूर : कुटुंब नियोजनाची जबाबदारी सर्वांची असली तरी, नसबंदी शस्त्रक्रियेचा भार मात्र जिल्ह्यातील महिलाच मोठ्या प्रमाणात उचलत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत झालेल्या एकूण 37,330 शस्त्रक्रियांपैकी तब्बल 36,851 शस्त्रक्रिया महिलांच्या झाल्या आहेत. याउलट, केवळ 479 पुरुषांनीच नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांचा हा सहभाग नगण्य असून, कुटुंब नियोजनात पुरुष उदासीन असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
* जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या मागील तीन वर्षांच्या अहवालानुसार, दरवर्षी महिलाच मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.
* 2022-23 आणि 2023-24 मध्ये शस्त्रक्रियांचे प्रमाण समाधानकारक असले तरी, त्यात महिलांचाच 98 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
या सेवा आहेत मोफत
* कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध सेवा पूर्णपणे मोफत पुरवल्या जातात.
* यामध्ये प्रामुख्याने : स्त्री आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया (टाक्याची आणि बिनटाक्याची)
* कॉपर-टी (तांबी) बसवणे गर्भनिरोधक गोळ्या आणि निरोधचे वाटप
’अंतरा’ या गर्भनिरोधक इंजेक्शनची सुविधा.
पुरुषांमध्ये नसबंदी शस्त्रक्रियेबाबत अनेक गैरसमज आहेत. शस्त्रक्रियेमुळे पुरुषत्वावर परिणाम होतो, शरीरात अशक्तपणा येतो, जास्त श्रमाची कामे करता येत नाहीत, अशा अनेक निराधार समजुतींमुळे पुरुष या शस्त्रक्रियेकडे पाठ फिरवत आहेत. ही केवळ स्त्रियांची जबाबदारी आहे, असा सामाजिक दृष्टिकोनही यामागे कारणीभूत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आम्ही सातत्याने जनजागृती करत आहोत, पण पुरुषांचा सहभाग वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे.