कोल्हापूर : कौटुंबिक वादातून शर्मिला अमरसिंग शिंदे (वय 35, रा. महालक्ष्मी पार्क, अंबाई टँकजवळ, मूळ रा. इस्लामपूर, सांगली) यांच्यावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पती अमरसिंग मारुती शिंदे (वय 37, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, इस्लामपूर) याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी अंबाई टँकजवळ आयरेकर मळा येथे ही घटना घडली.
जखमी शर्मिला यांची आई अलका मधुकर गावडे (रा. राजेबागेस्वारनगर, इस्लामपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, कौटुंबिक वादामुळे पती-पत्नी विभक्त राहतात. पती व सासरची मंडळी त्रास देत असल्याची तक्रार करून शर्मिला यांनी कोल्हापूर येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे.
न्यायालयातील तक्रारीमुळे पती व पत्नी यांच्यात वारंवार मतभेद होत. शुक्रवारी सायंकाळी शर्मिला मोपेडवरून घरी जात असताना पतीने त्यांना आयरेकर मळ्याजवळ अडविले. दोघांत जोरात वादावादी झाली. पतीने दुचाकीच्या सायलन्सरच्या लोखंडी पाईपने डोक्यात हल्ला केला. खोलवर जखम होऊन शर्मिला रस्त्यावर कोसळल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पती फरार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिस पथके इस्लामपूरकडे रवाना झाली आहेत, असे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.