बांबवडे : शित्तूर-वारुण येथे सरपंच, ग्रामसेवक यांच्या बनावट सह्या आणि ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का मारून, बनावट ताबापट्टी द्वारे विविध कामांचे बिल काढून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन शाहूवाडी पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती शाहूवाडी यांना देण्यात आले.
याबाबत शित्तूर-वारुण ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.वर्षा विकास झेंडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात शित्तूर-वारुण पैकी पाटीलवाडी येथे आमदार विकास कार्यक्रम सन 2024 -2025 अंतर्गत 1500000( पंधरा लक्ष ) इतक्या रकमेचे रस्त्याचे काँक्रेटी करणाचे काम पूर्ण झाले असून, त्याची बनावट ताबापट्टी तयार करून त्याच्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या बनावट सह्या मारून, ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का मारलेला आहे. याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टर जालिंदर संभाजी दिंडे (रा. ओकोली पैकी कडेवाडी, ता. शाहूवाडी) आणि सब कॉन्ट्रॅक्टर तानाजी बापू भोसले (रा. शित्तूर - वारुण ता. शाहूवाडी) यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शित्तूर-वारुणच्या माजी सरपंच सौ. विद्या धनाजी सुतार यांच्या कार्यकाळात सण 2022- 2023 मध्ये शित्तूर - वारुण पैकी रामवाडी येथे आमदार स्थानिक विकास अंतर्गत 9,99,998( नऊ लक्ष नव्यान्नव हजार नऊशे अठ्ठ्यानव रुपये ) इतक्या रकमेचे सभागृहाचे काम पूर्ण झाले. असून या कामामध्ये ग्रामपंचायत शित्तूर-वारुणच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्या बोगस सह्या आणि ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का तयार करून बनावट ताबापट्टी तयार केली.