कोल्हापूर : शहरात स्टेशन रोडसह शाहूपुरी परिसरात पाचशे रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटांची तस्करी करणार्या दोन संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. राहुल प्रकाश किरुगडे (33, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर, मूळ रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) व गुरू राजेंद्र मेंगाणे (23, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून एक लाख 31 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी संशयितांच्या घरांवर तत्काळ छापे टाकून झडतीही घेतली. बनावट नोटाप्रकरणी आंतरराज्य रॅकेट उघडकीला येण्याची शक्यता आहे.
बनावट नोटाप्रकरणी आठवड्यापासून शहरात दबक्या आवाजात चर्चा होती. व्यापारीवर्गातूनही याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. टोळीतील एक संशयित तरुण बनावट नोटा खपविण्यासाठी शहारातील मध्यवर्ती स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानकासह शाहूपुरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने सोमवारी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित राहुल किरुगडे आणि नोटा घेणारा गुरू मेंगाणे यांच्या हालचाली वाढल्या. पोलिसांनी गराडा घालून दोघांना ताब्यात घेतले.
पथकाने संशयितांची अंगझडती घेतली. त्यात किरुगडेकडे 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा मिळून आल्या. संशयित किरुगडे याने पाचशे रुपये किमतीच्या हुबेहूब दिसणार्या बनावट नोटा कोणाकडून घेतल्या, आजवर त्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात किती नोटा खपवल्या, याचाही पोलिस शोध घेत आहेत. बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये शहरातील काही स्थानिक तरुणांचा सहभाग असावा का, याचीही पोलिस माहिती घेत आहेत.
संशयितांना आणखी कोणाकडून आश्रय मिळत होता का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. संशयित किरुगडे व मेंगाणे यांना मंगळवारी (दि. 17) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी रात्री पत्रकारांना सांगितले. हवालदार अंमलदार मिलिंद बांगर, रवी आंबेकर, कृष्णा पाटील, महेश पाटील, गौरव शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दोघांच्या घरांची झडती
संशयितांना बनावट नोटांसह जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी किरुगडे याच्या पाडळी खुर्द येथील खोलीची झडती घेतली. कर्नाटकातील गजबरवाडी येथे मेंगाणेच्या घरावरही छापा टाकून झडती घेण्यात आली. मात्र, घरात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत, असेही सांगण्यात आले. संशयितांकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. मोबाईल कॉल डिटेल्सवरून महत्त्वाचे धागेदोरे हाताला लागतील. संशयितांविरुद्ध रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 178, 179 आणि 180 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यात रॅकेटची पाळेमुळे?
बनावट नोटाप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी बेड्या ठोकलेला किरुगडे पेंटिंग काम करतो. मेंगाणे पडेल ती कामे करतो. या प्रकरणात मास्टरमाईंडसह व्यापक साखळी असावी, असा पोलिसांचा संशय आहे. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटकातही संशयितांचे धागेदोरे असावेत, अशी शक्यता आहे. जप्त केलेल्या बनावट नोटांची छपाई कुठे करण्यात आली, याचा छडा लावणे हे तपासाच्या द़ृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. संशयितांना बनावट नोटा पुरवणार्या काही संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचेही सांगण्यात आले. संशयितांच्या अटकेनंतर सूत्रधारासह टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यताही पोलिस अधिकार्यांनी व्यक्त केली.