कोल्हापूर : क्रॉईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करून शिंगणापूर (ता. करवीर) येथील सेंट्रिंग कामगाराचे लक्ष्मीपुरीतील भरचौकातून मोटारीतून अपहरण, बेदम मारहाण करून खिशातील रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना बुधवारी उघडकीला आली. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याचा साथीदार फरार झाला आहे. सूरज अरुण पाटील (वय 20, रा. म्हालसवडे, ता. करवीर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शिंगणापूर येथील सेंट्रिंग कामगार योगेश तानाजी कांबळे (25) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गडहिंग्लज व कोगनोळी येथील सेंट्रिंग कामावरून सहकारी कामगारांसमवेत कांबळे सोमवारी रात्री उशिरा दुचाकीवरून कोल्हापुरात आले. कामगाराला सायबर चौकात सोडून रात्री उशिरा लक्ष्मीपुरी येथील चौकात आले असता, मोटारीतून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना अडविले.
क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करून कामगाराला मोटारीत जबरदस्तीने बसविले. तेथून पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे जायचे आहे. असे सांगून जयंती नाल्यावरील पुलाजवळ नेले. भामट्यांनी कामगाराची झडती घेतली. अटक करीत नाही, सोडून देतो, असे सांगून 20 हजारांची मागणी करण्यात आली. आपणाकडे पैसे नसल्याचे सांगताच कांबळे यांना मोटारीत बेदम मारहाण करण्यात आली. खिशातील 5 हजारांची रोकड काढून घेण्यात आली.
खानविलकर पंप कॉर्नरवरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात नेले. तेथे पुन्हा मारहाण करण्यात आली. तेथून पुन्हा लक्ष्मीपुरी येथील मार्केट परिसरात सोडून भामटे मोटारीतून पसार झाले. या घटनेनंतर कांबळे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे मोटारीचा क्रमांक निष्पन्न झाला. त्या आधारे म्हालसवडे येथून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर, सहायक निरीक्षक खंडू गायकवाड यांनी सांगितले. फरारी संशयिताचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.