कोल्हापूर

कोल्हापुरात बनावट नोटांचे रॅकेट उघड; सातजण गजाआड

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करून चलनात खपवणार्‍या टोळीचा छडा कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात तरुणांना अटक केली आहे. रोहन तुळशीदास सूर्यवंशी (वय 24, रा. गडमुडशिंगी), कुंदन प्रवीण पुजारी (23, रा. धरतीमाता हौसिंग सोसायटी, विचारे माळ), ऋषीकेश गणेश पास्ते (23, रा. गंगावेस, कोल्हापूर) या तिघांसह अजिंक्य युवराज चव्हाण (26, मूळ रा. कळाशी, ता. इंदापूर, पुणे, सध्या रा. कसबा बावडा), केतन जयवंत थोरात (30, रा. औंड, ता. कराड, सध्या रा. पिंपरी, पुणे), रोहित तुषार मुळे (33, रा. मलकापूर, ता. कराड), आकाश राजेंद्र पाटील (20, रा. भैरवनाथनगर, काले, ता. कराड, सध्या रा. पिंपरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावेआहेत. बँकेच्या 'सीडीएम' मशिनमध्ये पैसे भरणा करताना 50 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये स्वीकारले गेले नसल्याच्या एका धाग्यावरून हे प्रकरण उघडकीस आले.

या प्रकरणाचा मास्टरमाईंड कराडचा रोहित मुळे हा ग्राफीक डिझाईनर आहे; तर उर्वरित तरुणांपैकी काही तरुण हे पदवीधर आहेत. सातही तरुणांना पोलिसांनी अटक केली असून, गुरुवारी 11 एप्रिलपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दि. 28 मार्च रोजी राजारामपुरी येथील एका एटीएम सेंटरच्या डिपॉझिट मशिनमध्ये (सीडीएम) 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा जमा झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शाहूपुरी पोलिसांनी तपास केल्यानंतर हे बनावट नोटा जमा झालेले खाते नवी मुंबईतील एका व्यक्तीचे असल्याचे समोर आले. मात्र, कोल्हापुरातील मित्राने त्याच्या खात्यावर पैसे जमा केल्याचे खातेधारकाने सांगितले. त्यावरून डिपॉझिट मशिनमध्ये पैसे जमा करणार्‍या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर बनावट नोटा छापणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या बनावट नोटा पुणे आणि कराड येथील तरुणांकडून मिळाल्याचे समजताच पोलिसांनी छापेमारी करून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील प्रिंटर, कागद, लॅपटॉप, कटर आणि काही बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अजय सिंदकर हे करत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

खासगी सावकारीमार्गे बनावट नोटांचे रॅकेट उघड

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील रोहन सूर्यवंशी याच्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने तो पैशाच्या विवंचनेत होता. इंदापुरातील मित्र अजिंक्य चव्हाण याने त्याला बनावट नोटा घेऊन कर्जाची परतफेड करण्याचा मार्ग सुचवला. त्यासाठी त्याने सूर्यवंशीला पुण्यातील केतन थोरात-पाटील याचा मोबाईल नंबर दिला. बनावट नोटा आणण्यासाठी रोहन याने पुजारी आणि पास्ते यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने पुण्यात जाऊन केतनकडून दहा हजार रुपयांच्या बदल्यात 25 हजारांच्या बनावट नोटा आणल्या. त्यातील प्रत्येकी 12 हजार रुपये कुंदन पुजारी आणि ऋषीकेश पास्ते यांना दिले. स्वत:कडे ठेवलेले एक हजार रुपये खर्च केले. पास्ते याने दहा हजारांच्या बनावट नोटांसह एकूण 50 हजार रुपये दरमहा 14 टक्के व्याजाने एका व्यक्तीला दिले. ते पैसे डिपॉझिट मशिनमध्ये भरल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांच्या तपासात बनावट नोटांची मागणी करणार्‍यांपासून ते पोहोचवणारी साखळी उलगडली. डिपॉझिट मशिनमध्ये नोटा भरणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनवले आहे. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे, संदीप जाधव आदी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बनावट नोटांतून भागवली दहा हजारांची उधारी

गडमुडशिंगीच्या रोहन सूर्यवंशी याने कुंदन आणि ऋषीकेश यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले. ते दहा हजार रुपये घेऊन तो केतन थोरातकडे गेला. 10 हजार रुपयांच्या खर्‍या नोटा देऊन त्या मोबदल्यात 25 हजार रुपयांच्या बनावट नोटा त्याने खरेदी केल्या. या बनावट नोटांतून त्याने प्रत्येकी 12 हजार रुपये कुंदन आणि ऋषीकेश यांना दिले. त्यातील एक हजार रुपये त्याने वापरले. अजिंक्य चव्हाणने केतन थोरातची ओळख रोहन सूर्यवंशीला करून दिली. पास्ते याने या साक्षीदाराला 50 हजार रुपये व्याजाने दिले होते. त्यामध्ये त्याने दहा हजार रुपयांच्या बनावट नोटा खपवल्या. याची कल्पना साक्षीदाराला नव्हती. साक्षीदाराने हे पैसे 'सीडीएम'मध्ये भरले. त्यामध्ये बनावट नोटा रिजेक्ट झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT