बनावट औषधे प्रकरण  
कोल्हापूर

शासकीय हॉस्पिटलना बनावट औषधे पुरवठा करणार्‍या 5 कंपन्यांवर गुन्हा

कोल्हापुरातील विशाल एंटरप्रायझेसचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः शासकीय हॉस्पिटलना बनावट औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पाच कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कॅभी जेनेरिक स्टोअर, मीरा रोड, ठाणे, अ‍ॅक्टिवेन्टिस बायोटेक प्रा. लि., भिवंडी, जेनेरिकेज, ठाणे, फार्माक्सिज बायोटेक, सुरत आणि विशाल एंटरप्रायझेस, बाबुजमाल रोड, कोल्हापूर आदी कंपन्यांचा त्यात समावेश आहे. ठाणे आणि सुरतमधील कंपन्यांकडून या कंपन्यांनी औषधे घेतली होती. अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक भारत प्रकाश देवेकर यांनी त्यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, दीड वर्षापूर्वी विशाल एंटरप्रायझेस या कंपनीने अ‍ॅक्टिवेन्टिस बायोटेक कंपनीकडून औषधांची खरेदी केली होती. राज्यभरातील विविध शासकीय हॉस्पिटलला त्या औषधांचा पुरवठा केला होता. परंतु, संबंधित औषधे बनावट असल्याची माहिती मिळताच विशाल एंटरप्रायझेस कंपनीने पुरवठा केलेली औषधे परत मागविली. त्यानंतर त्या औषधांचा पुरवठा थांबविला. मात्र, अन्न व औषध विभागातील तत्कालीन निरीक्षक मनोज अया यांनी विशाल एंटरप्रायझेसच्या गोडावूनची तपासणी करून औषधांचे नमुने घेतले. मुंबईतील फॉरेन्सिक लॅबकडे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर औषधे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विशाल एंटरप्रायझेसवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाण्यातील कंपनीकडून औषध खरेदी

ठाणे येथील अ‍ॅक्टिवेन्टिस बायोटेक प्रा. लि. या कंपनीकडून विशाल एंटरप्रायझेसने औषधे खरेदी केली होती. संबंधित औषधे प्रमाणित असल्याचे पत्रही विशाल एंटरप्रायझेसने त्या कंपनीकडून घेतले होते. परंतु, अ‍ॅक्टिवेन्टिस कंपनीने ते पत्रही बनावट दिल्याचे समजते. परिणामी, बनावट औषधे ठाण्यामधील इतर दोन कंपन्यांसह गुजरातमधील सुरत फार्माक्सिज बायोटेक कंपनीकडून आल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, विशाल एंटरप्रायझेसने परत मागविलेली आणि त्यांच्या गोडावूनमध्ये ठेवलेली 42 लाख 60 हजार 692 रुपये इतक्या किमतीची औषधे अन्न व औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी पाच महिन्यांपूर्वीच जप्त केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT