Fake Mark Sheet of Shivaji University
शिवाजी विद्यापीठाचे बनावट गुणपत्रक File Photo
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचे बनावट गुणपत्रक; सावंतवाडीच्या युवतीसह दोघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नावासह हुबेहूब लोगोचा वापर करून बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रके तयार केल्याच्या संशयावरून सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. जोगेश्वरी, मुंबई) येथील युवतीसह कोकणनगर, चेंबूर मुंबईमधील तरुणाविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला. दीप्ती वसंत गावडे व प्रवीण बाबुराव शेलार अशी त्यांची नावे आहेत. बनावट प्रमाणपत्र आणि गुणपत्रके तयार करून देण्यात मोठे रॅकेट सक्रिय असावे, असा संशय तपासाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी गत सप्ताहात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पाठोपाठ शनिवारी दोन गुन्हे दाखल झाले. या टोळीची वाढती व्याप्ती लक्षात घेत वरिष्ठस्तरावर चौकशी करण्यात येत असून, संशयितांना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.

सावंतवाडी येथील दीप्ती गावडे हिने एका बँकेत नोकरीसाठी अर्ज केला होता. संबंधित बँकेने युवतीची शैक्षणिक कागदपत्रे पडताळणीसाठी शिवाजी विद्यापीठाकडे पाठविली होती. बी.कॉम. भाग तीनचे गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र आणि स्थलांतर दाखला बनावट असल्याचे आढळून आले. दि. 21 जून 2024 रोजी हा प्रकार निदर्शनास आला. विद्यापीठातील कर्मचारी प्रल्हाद जाखले (रा. कसबा बावडा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

दुसर्‍या घटनेत प्रवीण शेलार याने एका खासगी फर्ममध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याचीही कागदपत्रे तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाकडे आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. शेलार याने बी.कॉम. भाग 1 व 2 आणि 3 चे गुणपत्रक, पदवीचे बनावट प्रमाणपत्र करून घेतल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले. विद्यापीठाचे नाव आणि हुबेहूब लोगोचा गैरवापर केल्याची फिर्याद विद्यापीठ कर्मचारी दीपक अडगळे (रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. आठवड्यात फसवणूकप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ माजली आहे.

SCROLL FOR NEXT