कोल्हापूर : सहाचाकी ट्रकमध्ये गोवा बनावट विदेशी दारूच्या सोळाशेवर बॉक्सची थप्पी लावून गोव्यातून कोल्हापूरमार्गे राजस्थानकडे तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने राजापूर-मलकापूर रोडवर अणुस्कुरा फाट्याजवळ रोखला. 1 कोटी 15 लाख रुपयांचा बनावट दारूसाठा जप्त करून चालकाला बेड्या ठोकल्या. रामजीवन विरधाराम बिष्णोई (वय 26, रा. विरधाराम, जि. बाडमेर, राजस्थान) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.
गोवा-गुजरात, राजस्थानसह आंतरराज्य रॅकेटचा छडा शक्य असल्याचे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले. ट्रकमधून 1 कोटी 15 लाख 20 हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्याने भरलेल्या 180 मिलीचे 1 हजार 600 बॉक्स, ट्रक, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
निरीक्षक सदानंद मस्कर, अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, कांचन सरगर, विलास पवार यांच्या पथकाने पाठलाग करून फाट्याजवळ ट्रक रोखला. झडतीत ट्रकच्या हौद्यात गोव्यात निर्मिती झालेल्या आणि महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असलेल्या बनावट दारूच्या बॉक्सचे सोळाशेवर बॉक्स आढळून आले. गोवा बनावट दारूसाठा हस्तगत करून संशयित रामजीवन बिष्णोईला अटक करण्यात आल्याचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले.