मूल होण्यासाठी अशा वडाच्या कळ्यांमध्ये अंगारा भरून महिलांना दिला जातो. 
कोल्हापूर

Kolhapur : नारळात अंगारा, वडाची कळी; भोंदूबाबांच्या जाळ्यात ‘तिचा’ बळी

महिलांच्या सामाजिक व मानसिक हतबलतेचा गैरफायदा घेत अघोरी कृत्यांचे पेव

पुढारी वृत्तसेवा
अनुराधा कदम

कोल्हापूर : मूल होत नसेल तर तिला प्रचंड टोमणे सहन करावे लागतात. माहेरहून पैसे, वस्तू आणण्यासाठी होणार्‍या छळामुळे तिची मानसिकता बिघडते. आर्थिक घडी विस्कटली की तिला काळजीने ग्रासते. नवर्‍याचे व्यसन, व्यभिचार यामुळे ती अस्वस्थ होते. महिलांच्या अगतिकतेची ही दुखरी नस ओळखून भोंदूबाबांकडून गैरफायदा घेण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे.

अघोरी उपाय असुरक्षित घातक

मूल होत नसलेल्या महिलांच्या मानसिक अवस्थेला भोंदूबाबा लक्ष्य बनवतात. मूल होत नसेल तर खोटे मंत्र पुकारून नारळात अंगारा घालून दिला जातो, तर गर्भधारणा राहिल्यानंतर मुलगाच होईल, असे सांगून वडाच्या चिकासह कळ्या मंतरून भंडारा घालून खाण्यासाठी दिल्या जातात. हे उपाय सांगण्यासाठी अवाजवी पैसे दक्षिणा म्हणून घेतले जातात. भोंदूबाबा दिवसभर महिलांना ताटकळत थांबवून ठेवतात. प्रसंगी त्यांना गुंगीचे औषध देउन शारीरिक जवळीक केली जाते. केवळ सामाजिक व कौटुंबिक दबावापोटी अनेक ग्रामीण भागातील महिला भोंदूबाबांच्या या उपायांना बळी पडत असल्याचे चित्र आहे.

आकर्षक जाहिरातबाजी आणि सहज उपलब्ध न होणारे साहित्य

महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भोंदूबाबा गावात पत्रकबाजी, सोशल मीडियावरील पोस्ट याद्वारे आकर्षक जाहिराती करतात. अघोरी उपायांसाठी महिलांना सहजपणे बाजारात उपलब्ध होणार नाही असे साहित्य आणायला सांगितले जाते. अनेकदा महिला घरी कुणालाही न सांगता हे उपाय करत असतात. याचा फायदा घेत भोंदूबाबा उपायांसाठी लागणार्‍या साहित्याचे भरमसाठ पैसे घेऊन महिलांना आर्थिक दरीत ढकलतात.

गर्भधारणेचा योग्य काळ कोणता, मुलगा किंवा मुलगी होण्यामागचे शास्त्रीय कारण याविषयी ग्रामीण महिलांना माहिती दिली पाहिजे. भोंदूबाबांकडून होणार्‍या अत्याचाराविरोधात तक्रार करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे तरच महिलांबाबत होणार्‍या या फसवणुकीला आळा बसेल.
गीता हासूरकर, सामाजिक कार्यकर्त्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT