कोल्हापूर : खरीप हंगामात शेतकर्यांची फसवणूक करणार्या बोगस खतांच्या विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, कृषी विभागाने धडक कारवाई करत 18 जणांचे परवाने निलंबित केले आहेत. भेसळयुक्त खतांचे सात नमुने अप्रमाणित आढळल्याने संबंधित उत्पादक आणि एका विक्रेत्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खत कंपन्या आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, शेतकर्यांना दर्जेदार खत मिळावे, यासाठी कृषी विभाग आक्रमक झाला आहे.
जिल्ह्यात बोगस खते आणि बियाणांची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने विशेष भरारी पथके तैनात केली होती. या मोहिमेत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जिल्ह्यातील 2,136 खत वितरक आणि 48 उत्पादकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 1,801 वितरक आणि 20 उत्पादकांकडून घेतलेले खत नमुने प्रयोगशाळेत तपासले असता तब्बल 193 नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली. यामुळे 150 वितरकांना तत्काळ खत विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात बोगस खतांवर कारवाई होत असली, तरी बोगस बियाणांची विक्री राजरोस सुरू असल्याचे चित्र आहे. कृषी विभाग जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री होत नसल्याचा दावा करत असला, तरी ग्रामीण भागात आजही अनेक विक्रेते शेतकर्यांची फसवणूक करत आहेत. या बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल शेतकर्यांमधून उपस्थित केला जात आहे.
जमिनीचा कस वेगाने कमी होतो. पीक उत्पादनात मोठी घट येते. शेतकर्यांचा खर्च वाढतो आणि उत्पन्न घटते. अनेकदा संपूर्ण शेतीच उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. खत खरेदी करताना पक्के बिल घ्या. विक्रेत्याकडे अधिकृत परवाना असल्याची खात्री करा. खताच्या गोणीवरील उत्पादक, उत्पादन तारीख, वजन आणि गुणवत्ता तपासा. संशय आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा.