कोल्हापूर

Rajesh Kshirsagar | श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला दिला जाईल; कोणावरही अन्याय होणार नाही

आराखड्याच्या भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनातील बाधित नागरिकांना योग्य मोबदला दिला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन देऊन मंदिर परिसर विकास आराखडा राबवताना करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान मंदिर व परिसर विकास आराखडा राबवत असताना प्रस्तावित भूसंपादनाशी निगडित नागरिक, व्यापारी, नगरसेवक, श्रीपूजक यांच्यासोबत क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव तसेच संबंधित मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, मंदिराचा विकास करताना भाविक आणि परिसरातील नागरिकांची सोय व्हावी, अशी शासनाची भूमिका आहे. भूसंपादन करताना कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही. मंदिर परिसरातील बाधित नागरिकांना जागेसाठी योग्य मोबदला देण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत विचार करण्यात येईल. भूसंपादनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन क्षीरसागर व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थित नागरिकांना केले. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

दर्शनरांग, सुसज्ज पार्किंग

३६० मिळकतींचे भूसंपादन करणे आवश्यक असून यातील ८९ मिळकती निवासी, १९५ वाणिज्य, तर ५३ मिळकती संयुक्त आहेत. मिळकत पत्रिकेवरील जमिनीचे क्षेत्र २८ हजार ५८ चौरस मीटर आहे. दर्शनरांग, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग, वाणिज्य संकुलांचा विचार करून दुकानगाळे, अन्नछत्र, मंदिर कार्यालय, ॲम्पी थिएटर, स्वच्छतागृह, हेरिटेज प्लाझा, लॉकर्स, चप्पल स्टॅन्ड व अन्य आवश्यक सुविधांचा विचार या विकास आराखड्यामध्ये करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT