गोळीबाराच्‍या घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी बघ्‍यांची गर्दी झाली होती. 
कोल्हापूर

Kolhapur Firing Incident | दोन तरुण आले, चार राऊंड फायर केले

दहा सेकंदांचा थरार : सुरज साखरेवरील गोळीबारचा प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकातील एका बांधकामाच्‍या ठिकाणी सराईत गुन्‍हेगार सुरज साखरे अन्‍य दोघांसोबत उभा होता. दुपारी साडेतीनच्‍या दरम्‍यान एक तरुण दुचाकीवरून तर एक तरुण दुचाकीमागून चालत आला. चालत आलेल्‍या तरुणाच्‍या खांद्यावर स्‍लिंगबॅग होती. त्‍याचा हात बॅगमध्‍येच होता. साखरे उभा असलेल्‍या ठिकाणी हा तरुण येताच त्‍याने बॅगेतील पिस्‍तूल काढले आणि दोन फुटांच्‍या अंतरावरून साखरेच्‍या दिशेने चार राऊंड फायर केले.

अवघ्‍या दहा सेकंदांच्‍या या थरारात काय आणि कासे घडले हे काही समजलेच नाही, असा थरारक प्रसंग अनुभवलेल्‍या आशिष साळोखे यांनी सांगितले. साखरेने क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत दुकानगाळा खरेदी केला आहे. त्या गाळ्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दुपारी तो मोटारीतून आला होता. पाहणी करून मोटारीजवळ मित्र आशुतोष नाईक, आर्किटेक्ट आशिष साळोखे यांच्यासोबत बोलत थांबला.

काही सेकंदातच हल्ला

साखरे बोलत असतानाच पाळत ठेवून काही अंतरावर थांबलेल्या दोघांपैकी एक मोपेडवरून पुढे आला, त्यासोबतच खांद्याला स्लिंगबॅग अडकवून दुसरा हल्लेखोर चालत आला. साखरेजवळ येताच चालत आलेल्या हल्लेखोराने बॅगेतून पिस्तूल काढून साखरेवर गोळ्या झाडल्‍या. पहिल्या दोन गोळ्या साखरेच्या पोटात घुसल्या. त्याचा मित्र नाईकने हल्लेखोरांवर दगडफेक केली. याच दरम्यान फायर केलेल्या पुढच्या दोन गोळ्या चुकवत साखरे पळत जाऊन झुडपात कोसळला. तिथून मोटारीत जाऊन बसला. जखमी साखरेला चालकाने रुग्णालयात दाखल केले.

दुचाकी घसरली, तरीही हल्लेखोर पसार

हल्ल्यानंतर दुचाकीवर थांबलेल्या तरुणाने गडबडीत दुचाकी वळविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती रस्त्यावरच घसरली. पण गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराने धावत येऊन दुचाकी उचलली आणि त्यावरून दोघेही क्षणात रंकाळा टॉवरच्या दिशेने पसार झाले.

दीड तास पाळत अन्‌ काढला बार

हल्लेखोरांनी घटनास्थळीची रेकी केली होती. दुपारी दीडपासून ते दबा धरून होते. सीसीटीव्हीत हे सर्व कैद आहे. मोपेडवर मागे बसलेल्या हल्लेखोराच्या बॅगेत पिस्तूल होते. काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या हल्लेखोराने चालत येत साखरेवर बार काढला.

दगड भिरकावले अन् ते पसार झाले

साखरेच्‍या दिशेने एका पाठोपाठ एक चार राऊंड फायर झाले. काय चाललंय हे समजलेच नसल्‍याने गोंधळ उडाला. आशिष साळोखे बिल्डिंगमध्‍ये गेले. साखरे चारचाकीत बसला. नाईकने हल्लेखोरांच्या दिशेने दगड भिरकावण्‍यास सुरुवात केली. मग ते तरुण तेथून पसार झाले.

चालकाने दाखवली तत्‍परता

साखरेचा चालक अनिल कांबळे चारचाकीतच बसून होता. फायरिंगनंतर साखरे जखमी अवस्‍थेतच चारचाकीत येऊन बसला. फायरिंगच्‍या आवाजाने काहीतरी घडल्‍याचा अंदाज चालकाला आला. चालकाने तेथून तत्‍काळ चारचाकी हलविली अन राजारामपुरीतील एक खासगी हॉस्‍पिटल गाठले. पावणेचार वाजता साखरेला उपचारासाठी दाखल केले.

हॉस्‍पिटलबाहेर समर्थकांची गर्दी

गोळीबाराची माहिती मिळताच साखरेच्‍या समर्थकांनी हॉस्‍पिटलबाहेर गर्दी केली. गोळीबार कसा झाला याची ते माहिती घेत होते. माजी नगरसेवक रविकिरण इंगवलेही तिथे आले होते. काहीवेळाने पोलिसही तिथे दाखल झाले.

टीप देणाऱ्याचाही शोध सुरू

साखरे इमारतीजवळ येणार असल्याची टीप हल्लेखोरांना पूर्वीपासूनच होती. यामुळे ही परफेक्‍ट टीप कोणी दिली, याचाही शोध पोलिस करत आहेत. साखरेच्या नजीकच्‍या कोणी ही माहिती पुरवली काय, याचाही शोध सुरू आहे.

हल्लेखोर स्थानिकच; गावठी पिस्तूलचा वापर

हल्लेखोर सराईत नसल्याचे तपासात समोर आले आहे. हल्लेखोरांनी तोंडाला कोणताही मास्क किंवा काहीही बांधले नव्हते. गोळ्या झाडताना दोन्ही‍ हातात पिस्तूल धरून गोळ्या झाडल्याचे सिसीटीव्हीत दिसत आहे. हल्ल्यासाठी गावठी बनावटीच्या पिस्तूलचा वापर केला होता. ७.६५ एमएमच्या चार गोळ्या झाडल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT