kolhapur | खंडणीसाठी धमकी; रविकिरण इंगवलेसह सात जणांवर गुन्हा 
कोल्हापूर

kolhapur | खंडणीसाठी धमकी; रविकिरण इंगवलेसह सात जणांवर गुन्हा

दोघांना अटक; दहा लाखांची मागणी, साडेचार लाख घेतले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : विकासकाम बंद पाडू, जीवे मारू अशी धमकी देत दहा लाखांची खंडणी मागत त्यापैकी साडेचार लाख रुपये घेतल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले याच्यासह सात जणांवर शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला. यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी अवघ्या काही वेळातच राकेश माने (रा. सनगर तालीम जवळ, मंगळवार पेठ) आणि सुमीत ऊर्फ सोन्या चौगुले (रा. फिरंगाई तालीम जवळ) या दोघांना अटक केली.

खुतबुद्दीन शेख (रा. गडहिंग्लज) यांनी तक्रार दिली आहे. रविकिरण इंगवले, फारुख बाबू खान, आनंद पाटील यांच्यासह अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. शेख यांनी कोल्हापूर शहरातील हरी ओमनगर परिसरात सर्व्हे नं. १०९३ मधील सुमारे आठ एकर जागा विकासासाठी घेतली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये शेख हे त्यांच्या मित्रासोबत विकासाच्या ठिकाणी असताना फारूख खान, आनंद पाटील यांच्यासह पाच जण साईटवर आले. रविकिरण इंगवले याच्या परवानगीशिवाय काम कसे सुरू केले, असा सवाल केला. त्यावर शेख यांनी इंगवले यांच्याशी संपर्क केला. काम सुरू ठेवायचे असल्यास दहा लाख रुपये द्या अन्यथा महापालिकेकडे तक्रार करून काम बंद पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप शेख यांनी तक्रारीत केला आहे.

पैसे न दिल्याने महापालिकेकडे तक्रार झाली. त्यावर सर्व कागदपत्रे दाखवली, तरीही दहा लाख रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नये, असे सांगत संशयितांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली. काम सुरू केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिली. यामुळे घाबरून जानेवारी २०२६ मध्ये १ लाख ५० हजार रुपये, फेब्रुवारीमध्ये १ लाख रुपये आणि ऑगस्ट २०२६ मध्ये २ लाख रुपये, असे एकूण ४ लाख ५० हजार रुपये फारूख खान याच्याकडे दिल्याचे शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT