मुदतबाह्य औषधांबाबत जनजागृती करूनही दुर्लक्ष  Pudhari File Photo
कोल्हापूर

मुदतबाह्य औषधांबाबत जनजागृती करूनही दुर्लक्ष

जिल्हा केमिस्ट असोसिएशनकडून साठवणुकीसाठी 14 ठिकाणी सोय

पुढारी वृत्तसेवा
एकनाथ नाईक

कोल्हापूर : जिल्हा केमिस्ट असोसिएशनने मुदतबाह्य झालेल्या औषधांचा साठा संकलित करण्याचा संकल्प गतसाली केला होता. त्यास सुरुवातीचे काही महिने चांगला प्रतिसाद मिळाला. आता ही संकल्पना नागरिकांना पचनी पडेना. शहरातील 14 औषध दुकानांमध्ये केमिस्ट असोसिएशनने मुदतबाह्य औषधे संकलनासाठी पेट्या ठेवल्या आहेत. येथे सुमारे 25 ते 30 हजारांची औषधे संकलित झाली असून आता ही संकल्पना थंड पडली आहे.

घराघरांत मुदतबाह्य झालेल्या औषधांचा साठा आहे. ही औषधे कशी नष्ट करायची याची माहिती रुग्णांसह नातेवाईकांना नाही. त्यामुळे मुदतबाह्य औषधे वर्षानुवर्षे घरात पडून राहतात. ही औषधे पर्यावरणपूरक पद्धतीने महापालिकेच्या सहकार्याने नष्ट केली जात होती. घराची स्वच्छता करताना ही औषधे एकत्र करून गटारी, नदी, ओढे, माळरानासह रस्त्यालगत आजही फेकून दिली जात आहेत. या औषधांचे दुष्परिणाम आहेत, पर्यावरणालाही याचा धोका आहे. याची कल्पना असूनही नागरिकांना याचे गांभीर्य नाही. घरांमधील मुदतबाह्य औषधांचा वाढता साठा लक्षात घेऊन केमिस्ट असोसिएशनने गेल्या वर्षीपासून ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.

केमिस्ट असोसिएशनने शहरातील 14 ठिकाणी मुदतबाह्य औषधे साठवणुकीसाठी पेट्या ठेवल्या आहेत. त्यावर मुदबाह्य औषधांचे दुष्परिणामांंची माहिती दिली आहे. शहरातील औषध दुकांनामध्ये जनजागृतीचे स्टिकर लावले आहेत. या संकल्पनेला सुरुवातीला रुग्ण, नागरिक यांनी चांगला प्रतिसाद दिला. आता ही संकल्पना थंड पडली आहे. पुन्हा मुदतबाह्य औषधे जागा मिळेल तेथे टाकली जात आहेत. केमिस्ट असोसिएशनने मुदतबाह्य औषधे साठवणुकीचा राबविलेल्या उपक्रमाला समाजातील सर्वच घटकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. मुदतबाह्य औषधांचे दुष्परिणाम पर्यावरणाबरोबर नागरिक, भटक्या प्राण्यांसाठी धोक्याचे आहेत. ‘जीव वाचवणारे औषधे मुदबाह्य झाल्यानंतर जीव घेणे ठरते’ हे सर्वांनी लक्षात घेऊन केमिस्ट असोसिएशनच्या उपक्रमाला साथ दिलीच पाहिजे.

औषधे नष्ट करण्याचा खर्च ‘केमिस्ट’चा

केमिस्ट असोसिएशन जमा झालेली मुदतबाह्य औषधे नष्ट करण्यासाठी महापालिकेकडे देते. ही औषधे पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट केली जातात. त्यासाठी येणारा खर्च केमिस्ट असोसिएशनने उचलला आहे. या संकल्पनेला नागरिकांनी प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. मुदतबाह्य औषधे उघड्यावर टाकण्यापेक्षा औषध दुकानात ठेवलेल्या पेट्यांमध्ये जमा करावीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT