सुनील कदम
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला भेडसावणारा महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने 3200 कोटी रुपयांची एक योजना हाती घेतली आहे; पण या योजनेच्या यशस्वीतेबद्दल तज्ज्ञांमधून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
कृष्णा खोर्यातील सर्व नदीपात्रांचे आणि ओढ्या-नाल्यांचे खोलीकरण, अतिक्रमणे हटविणे व महापुराचे जवळपास 115 टीएमसी पाणी वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे बोगदा काढून या बोगद्यातून हे पाणी फलटण तालुक्यात नीरा नदीत सोडून दुष्काळी भागाकडे वळविणे असे या योजनेचे थोडक्यात स्वरूप आहे. मात्र, या योजनेत अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. महापुराचे पाणी उचलणार म्हणजे कुठून, किती आणि कसे उचलणार? सांगली जिल्ह्यातून किती टीएमसी पाणी उचलणार आणि कोल्हापूर जिल्ह्यातून किती पाणी उचलणार हा सर्वात गहन सवाल आहे. महापुराच्या वेळी म्हणजे 15 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान राजापूर बंधार्यावरून पुढे कर्नाटकात जवळपास 450 ते 500 टीमसी पाणी वाहून जाते. अलमट्टी धरणातून पुढे 300 ते 350 टीएमसी पाणी वाहून जाते, म्हणजे कोयना आणि उजनीसारखी तीन-चार धरणे भरतील एवढे पाणी महाराष्ट्रातून पुढे कर्नाटकात वाहून जाते. यातील एक दशांशही पाणी उचलण्याची यंत्रणा सध्या जलसंपदा विभागाकडे नाही!
सध्या कृष्णा नदीवर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या उपसा जलसिंचन योजना कार्यरत आहेत. टेंभू योजनेची वार्षिक उपसा क्षमता 28 टीएमसी इतकी आहे, ताकारीची क्षमता 9 टीएमसी आणि म्हैसाळ योजनेची वार्षिक उपसा क्षमता 18 टीएमसी आहे. महापुराचे पाणी उपसा करून ते दुष्काळी भागात टाकण्यासाठी या तीनही योजना पावसाळ्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण क्षमतेने चालू ठेवल्या तरी फार फार तर दहा टीएमसी पाण्याचा उपसा करतील. या दहा टीएमसी पाण्यामुळे कृष्णा-वारणा नद्यांच्या महापुरात असा कितीसा फरक पडणार आहे? कोल्हापूर जिल्ह्यात तर अशा मोठ्या उपसा सिंचन योजना पंचगंगा नदीवर नाहीत. पंचगंगेच्या महापुराचे पाणी उचलण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा नाही. तातडीने अशी यंत्रणा उभा करायची ठरविली तरी त्यासाठी आठ-दहा वर्षे लागतील.
महापुराचे पाणी वाहून नेण्यासाठी साटपेवाडी येथील बोगद्याची क्षमता 10 हजार क्युसेक असल्याचे समजते. बोगद्याची ही क्षमता विचारात घेता येथून 115 टीएमसी पाणी वळविता येणे शक्य नाही, फार फार तर पंचवीस-तीस टीएमसी पाणी वळविता येईल, असे जाणकारांचे मत आहे.
सध्या सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील सिंचनासाठी वेगवेगळ्या उपसासिंचन योजनांची कामे चालू आहेत. अशावेळी या जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वळविण्यात येणारे पाणी कितपत उपयोगी पडेल याची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय वार्षिक पंधरा-वीस टीएमसीची गरज असलेल्या या भागाला केवळ पावसाळ्याच्या दिवसात एकदम शे-दीडशे टीएमसी पाणी दिले तर त्यांच्या सिंचनाचे गणित कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही.
राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या योजनेनुसार महापुराचे किती पाणी उचलायचे, कुठून उचलायचे, कसे उचलायचे, ते कुणाला द्यायचे, किती द्यायचे, कसे द्यायचे, त्यांना नको असेल तर त्या पाण्याचे काय करायचे यापैकी एकाही प्रश्नाची समाधानकारक उत्तरे सध्या तरी संबंधितांकडे नाहीत.