Ambabai Temple | अंबाबाई मंदिर जतन-संवर्धन कामाच्या आढाव्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार File Photo
कोल्हापूर

Ambabai Temple | अंबाबाई मंदिर जतन-संवर्धन कामाच्या आढाव्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चालणार कामकाज

पुढारी वृत्तसेवा

अनिल देशमुख

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून पुढील आठवड्यापर्यंत समितीची स्थापना होणार आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे कामकाज सुरू राहणार आहे.

अंबाबाई मंदिर व परिसर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात मंदिर जतन व संवर्धनाची १८३ कोटींची कामे सुरू आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. मंदिराचे पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व, स्थापत्यकला आणि भाविकांची श्रद्धा या सर्वांचा विचार करून मंदिराचे काम व्हावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक, भाविक करत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत मंदिर जतन आणि संवर्धनाबाबत आवश्यक आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश केला आहे. समिती स्थापनेबाबतचा आदेश दोन-तीन दिवसांत काढला जाणार आहे.

समिती काय करणार

मंदिराचे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनासाठी जे काम सुरू आहे, त्या कामांचा आढावा घेईल. त्याकरिता समितीच्या बैठका होतील. या बैठकांद्वारे कामकाजाचा दर्जा, कामकाजाची गती, मंदिरांचे पावित्र्य, धार्मिक भावना आणि मूळ सौंदर्य, स्थापत्यकला आदींना बाधा येणार नाही, अशा पद्धतीने काम सुरू आहे की नाही, आदी बाबींवर नियंत्रण ठेवले जाईल. चुकीच्या पद्धतीने काम होत नाही ना, याबाबतही दक्षता घेतली जाईल. बांधकामाबाबत दाखल होणाऱ्या तक्रारी, सूचना आदींची दखल घेतली जाईल. त्याद्वारे पडताळणी होईल. संबंधित तक्रारदार, सूचना करण्यांशी संवाद साधला जाईल. चुकीच्या पद्धतीने कामकाज होत असेल तर त्यात दुरुस्तीबाबतची सूचना केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT