कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा वनवास 35 वर्षे सुरूच Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा वनवास 35 वर्षे सुरूच

अर्थसंकल्पात बजेटहेड निर्माण झाले, दोन सर्व्हे झाले, गतिशक्ती योजनेस मंजुरीही मिळाली

पुढारी वृत्तसेवा
राजेंद्र जोशी

कोल्हापूर : देशाच्या स्वातंत्र्यानंतर 40 वर्षे पूर्ण होईपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर मुंबईपासून कोचीनपर्यंत तळकोकणात रेल्वे सुसाट वेगाने पळेल, या कल्पनेला खुळ्यात काढले जात होते. हा प्रकल्प रेल्वेच्या अर्थशास्त्रामध्ये आर्थिकदृष्ट्या परवडणारा नव्हता. गुंतवणुकीच्या प्रमाणात अत्यल्प मोबदला असल्याच्या अहवालामुळे प्रशासनानेही हा प्रकल्प कचर्‍याच्या टोपलीत ठेवला. परंतु, अशक्य वाटणार्‍या या प्रकल्पाला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे काम तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस, अर्थमंत्री मधू दंडवते आणि केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष रामकृष्ण हेगडे या तीन माणसांनी केले. प्रशासनाच्या अनेक अडथळ्यांना बाजूला सारत, पश्चिम घाटाच्या अनेक डोंगरांच्या पोटात शिरत कोकण रेल्वे मुंबईकडून कोचीनकडे अवघ्या आठ वर्षांत मार्गस्थ झाली. आता तिचे विद्युतीकरणही पूर्ण झाले. शिवाय ही रेल्वे आर्थिकृष्ट्या परवडणारी तर झालीच. शिवाय, कोट्यवधी कोकणी माणसांची ती लाईफलाईन ठरली आहे.

कोकण रेल्वेचा हा इतिहास देण्याचा हेतूच यासाठी, की कोकण रेल्वेची धाव सुरू झाली असताना 1990 मध्ये कोल्हापूर रेल्वेस्थानक कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी स्थानकाला जोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. सुमारे 103 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गामुळे देशाचे पूर्व-पश्चिम टोक जोडले जाणार होते. शिवाय, कोकणाच्या डोंगरकपारीत वास्तव्य करणार्‍या नागरिकांची ती जीवनदायिनी ठरणार होती. इतकेच काय, बंदराशी जोडले गेल्यामुळे सागरी वाहतुकीचा फायदा उद्योजकांना होऊन मुंबई पोर्ट ट्रस्टवरील ताणही कमी होणार होता. या प्रकल्पासाठी जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, सुरेश प्रभू या तीन रेल्वेमंत्र्यांनी समर्थन केले. 1998 साली कोल्हापूरचे तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी त्याचा पाठपुरावा करताना या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात बजेटशीर्ष निर्माण करून त्यावर एक रुपयाची तरतूद करणे सरकारला भाग पाडले होते. यामुळेच पुढे कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची दोन सर्व्हेक्षणे झाली. शिय-भुये-कळे मार्गे वैभववाडी आणि मुडशिंगी-पाचगाव-कळे मार्गे वैभववाडी अशा दोन मार्गांचा यामध्ये समावेश होता. मुडशिंगीमध्ये यासाठी भूमीसंपादनाच्या प्रक्रियेलाही सुरवात झाली होती. परंतु, त्यानंतर मात्र कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे घोंगडे अडकले आहे. मुंबईहून कोचीनला जोडणारा 760 किलोमीटर लांबीचा कोकण रेल्वेचा प्रकल्प अवघ्या आठ वर्षांमध्ये पूर्ण करून त्यावरून रेल्वे धावण्याची जादुई करामत ई श्रीधरन या अभियंत्याच्या नेतृत्त्वाखाली झाली. परंतु, गेली 35 वर्षे 100 किलोमीटरचा कोल्हापूर-वैभववाडी मार्ग मात्र लोंबकळतो आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची मागणी करण्यामध्ये दैनिक ‘पुढारी’चे योगदान अपूर्व असे आहे. मूळच्या गगनबावड्याच्या ‘पुढारी’कार ग. गो. जाधव यांनी कोकण रेल्वेची मागणी सर्वप्रथम केली. दैनिक ‘पुढारी’चे कणकवलीचे प्रतिनिधी शशी तायशेटे यांनी या विषयावर एक मालिका त्या काळात प्रसिद्ध केली होती. त्यावेळेपासून सातत्याने या मागणीचा पाठपुरावा दैनिक ‘पुढारी’ करतो आहे. दैनिक ‘पुढारी’च्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोेकण रेल्वेद्वारे कोकणाचे प्रवेशद्वार खुले करा, असे साकडे घातले. पंतप्रधानांनीही त्याला सशर्त पाठिंबा दर्शविला होता. आता रेल्वेच्या या प्रकल्पपूर्तीसाठी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींनी कंबर कसली पाहिजे. कारण हे आता घडले नाही, तर भविष्यात घडणे कठीण आहे.

(क्रमशः)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT