सुनील कदम
कोल्हापूर : सध्या देशभरात इथेनॉलमिश्रित इंधनाची चलती सुरू झाली आहे. पण, या इथेनॉलमिश्रित इंधनाबाबत वाहनधारकांमध्ये विचित्र संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसत आहे. विशेष म्हणजे जनतेच्या मनातील या शंका दूर करायला अधिकारवाणीने कुणी पुढे येताना दिसत नाही, ही शोकांतिका आहे. वाहन कंपन्यांची भूमिकाही गुलदस्त्यातच आहे.
सध्या राज्यात २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलची विक्री केली जात आहे. म्हणजे ८० टक्के पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉल! २०२२ साली पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण १० टक्के होते. २०२३-२४ मध्ये हे प्रमाण १४.६ टक्के करण्यात आले. गेल्या वर्षी हे प्रमाण १९ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आणि चालू आर्थिक वर्षांपासून हे प्रमाण २० टक्के करण्यात आले आहे. मात्र, इथेनॉलचे प्रमाण २० टक्के केल्यापासून वाहनधारकांमधून तक्रारींचा ओघ सुरू झालेला आहे.
इंजिनांची बनावट!
देशात आणि राज्यात इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर हा अगदी अलीकडे म्हणजे गेल्या चार वर्षांत सुरू झालेला आहे. त्यापूर्वी बनविली गेलेली बहुतांश चारचाकी आणि दुचाकी वाहनांची इंजिन्स ही पेट्रोल हेच इंधन ग्रहीत धरून बनविलेली आहेत. देशात आणि राज्यात इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर सुरू झाल्यानंतरही कोणत्याही वाहन कंपनीने आपण इथेनॉलमिश्रित इंधन वापरासाठी अनुकूल इंजिन बनविल्याचा दावा केलेला नाही. याचा अर्थ आजही पेट्रोल इंधनासाठीच बनविलेल्या वाहनांमध्ये इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर केला जात आहे. साहजिकच त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत, ते होणारच. मात्र, या बाबतीत वाहन कंपन्या किंवा शासकीय अधिकारी अधिकृतरीत्या बोलायला तयार नाहीत.
इथेनॉलचे सत्यस्वरूप!
इथेनॉल हे एक प्रकारचे संक्षारक आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर सुरू केल्यापासून अनेक वाहनधारकांच्या अशा तक्रारी आहेत की, इंधन पुरवठा करणाऱ्या रबरी नळ्या, रबरी सिल्स आणि प्लास्टिकचे भाग हळूहळू वितळू लागतात किंवा कमालीचे कडक होऊन निकामी होतात. परिणामी, वाहनांच्या देखभाल-दुरुस्ती खर्चात मोठी वाढ होत असल्याच्या तक्रारी आहेत. इथेनॉल हे संक्षारक स्वरूपाचे आम्ल असल्यामुळे तसे होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, या बाबतीतील वस्तुस्थिती वाहन कंपन्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे; अन्यथा इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापराबाबतचा संभ्रम दिवसेंदिवस वाढतच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय आहेत तक्रारी?
इथेनॉलची ऊर्जा निर्मिती क्षमता पेट्रोलच्या तुलनेत खूप कमी असते. त्यामुळे पेट्रोलवर चालणारी वाहने ४ ते ८ टक्के कमी मायलेज देत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत आणि त्यात मोठ्या प्रमाणात तथ्य आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही याला दुजोरा दिला आहे. इथेनॉलचा दुसरा गुणधर्म म्हणजे ते हवेतील आर्द्रता म्हणजेच पाणी शोषून घेते. त्याचा परिणाम असा होतो की, काही काळानंतर इंधनाच्या टाकीत काही प्रमाणात पाणी साचलेले दिसते. परिणामी, इंधनाच्या टाकीला आतून गंज चढणे, इंधनपंप खराब होणे आणि वाहनाच्या इंजिनमधील काही भाग खराब होण्यास सुरुवात होते. गावोगावचे मोटार मेकॅनिक याला दुजोरा देतात; पण अजूनतरी कोणत्याही वाहन कंपनीने या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.