Shree Jotiba Mandir, Campus Development Authority
श्री जोतिबा मंदिर Pudhari File Photo
कोल्हापूर

श्री जोतिबा मंदिर, परिसर विकास प्राधिकरणाची स्थापना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. प्राधिकरणाची स्थापना होणार असल्याने जोतिबा विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थान आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, या उद्देशाने विकास आराखडा तयार करण्यात आला. जोतिबा देवस्थानसह परिसरातील 23 गावांचा समावेश असलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विकास आराखड्याबाबत स्पर्धा घेण्यात आली, त्याद्वारे जोतिबा देवस्थानचा एकात्मिक विकास आराखडा अंतिम करण्यात आला आहे. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर जोतिबा मंदिर आणि संपूर्ण परिसराचा विकास केला जाणार आहे. या संपूर्ण परिसरात धार्मिक वृक्षलागवड, बर्ड पार्क, वॉटर बॉडीज्चे संवर्धन, सुशोभीकरण, यात्री निवास, भाविकांना विविध सुविधा आदींचा विकास केला जाणार आहे. देवस्थानसह परिसरातील सुमारे 8 ते 9 हजार एकर जमिनीवर प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने प्राधिकरण अस्तित्वात येणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोतिबा प्राधिकरणाची स्थापना केल्याची घोषणा केल्याने जोतिबा देवस्थान आणि परिसरातील विकासाला आता खर्‍या अर्थाने गती येणार आहे. यापूर्वी 1,500 कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला होता. त्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार नव्याने 1,815 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार केला आहे. जिल्हास्तरीय समितीसमोर सादरीकरण होणार आहे. या समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर हा आराखडा राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीपुढे सादर केला जाणार आहे. या समितीची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम मान्यतेसाठी आराखडा मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे जाणार आहे. या समितीकडून जो निधी मंजूर होईल, त्या निधीतून प्राधिकरणाद्वारे या परिसराचा विकास केला जाणार आहे.

विविध देवस्थानांचा अभ्यास करून आराखडा

तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर जोतिबा मंदिर आणि संपूर्ण परिसराचा विकास केला जाणार आहे. याकरिता आराखड्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. देशभरातील प्रमुख, विविध देवस्थानांचा अभ्यास करून भाविकांना देण्यात येणार्‍या सुविधांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला.

जोतिबा परिसर विकासासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान

जोतिबा परिसर विकासासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मोठे योगदान आहे. जोतिबा परिसराचा विकास करण्याची संकल्पना सर्वप्रथम 1990 मध्ये समोर आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जोतिबा परिसर विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. त्याला कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनाही निमंत्रण होते. मात्र, कार्यबाहुल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. पवार यांनी या बैठकीत परिसर विकासाचा विषय मांडताना, सरकारने जोतिबा परिसर विकासाचा पाच कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. मात्र, हा निधी तुम्हाला उभारून त्यातून विकास करावा लागेल, असे जाहीर केले. यावेळी बैठकीत तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांनी इतका निधी उभा करणे शक्य होईल असे वाटत नाही, असे स्पष्ट करतानाच ही जबाबदारी डॉ. प्रतापसिंह जाधव यशस्वीपणे पेलू शकतील, असे सांगितले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांनी डॉ. जाधव यांना फोन करून बैठकीत बोलावून घेतले. पवार यांनी जोतिबा परिसर विकासाची संकल्पना मांडून समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. जाधव यांच्यावर सोपविली. जोतिबा परिसर विकास समिती व जोतिबा परिसर विकास निधी समिती स्वतंत्र असावी. निधी समितीची जबाबदारी आपण घेऊ, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. हा प्रस्ताव मान्य झाला. पुढे 31 जानेवारी 1991 रोजी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते जोतिबा डोंगरावर मुहूर्ताची पहिली कुदळ मारून जोतिबा परिसर विकासकामांचा शुभारंभ झाला. त्यानंतर रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, परिसरात वनीकरण, शौचालय व स्नानगृह संकुल, सांडपाण्याची निर्गत, भक्तनिवास व पार्किंग असा आराखडा तयार करून तो पूर्ण झाला. जोतिबा डोंगराला जाणारा एकच रस्ता होता. तेथे पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. जोतिबा ते यमाई मार्ग केवळ दहा फुटांचा अरुंद होता. येथे चेंगराचेंगरी होत होती. ओबडधोबड दगडी पायर्‍या होत्या. याच मार्गावरून सासनकाठी व पालखी मिरवणूक जाते. हा मार्ग 32 फूट रुंद व सुव्यवस्थित अशा दगडी पायर्‍या करण्यात आल्या. त्याचबरोबर जोतिबा व यमाई मंदिर आवारात फरशी बसविण्यात आली. दीपमाळांचे स्थलांतर करण्यात आले. सेंटर प्लाझा व कमर्शियल कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात आली. भूमिगत विद्युतीकरण करून स्मृतिभवन उभारण्यात आले. अल्पकाळात 5 कोटींचा निधी जमविण्याचे काम करत डॉ. जाधव यांनी जोतिबा परिसर विकासात मोलाचे योगदान दिले आहे. यानंतरही सातत्याने जोतिबा विकासासाठी डॉ. जाधव यांचा पाठपुरावा सुरू आहे.

SCROLL FOR NEXT