कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड, गंगाई लॉन पिछाडीस गॅगवारमधून झालेल्या खुनातील मारेकर्यांना जेरबंद करण्यासाठी संयुक्त शोध पथकातील पोलिसांनी तीन दिवस रात्रीचा दिवस केले. पण टोळीच्या म्होरक्यासह साथीदार हाताला लागत नव्हते. सोमवारी दुपारी म्होरक्या आदित्य गवळी सीपीआर चौकात आल्याचा सुगावा लागला. सापळा रचला गेला. पोलिसांची चाहूल लागताच आदित्य निसटला. त्याने कसबा बावडा रोडवरील बार गाठला. आडोशाला लपून एकच प्याला रिचवत असताना पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि काही क्षणातच त्याच्या मुसक्या आवळल्या.
महेश राख खुनातील मारेकर्यांना जेरबंद करण्यासाठी संयुक्त शोध पथकांनी उपनगरांसह वडगाव, वाठार, पेठ नाका, सांगली, मिरज, कर्नाटकातील बेळगाव, रायबाग, चिक्कोडी परिसरात शोध घेतला. सोमवारी सायंकाळपर्यंत चार संशयितांचा छडा लागला. सोमवारी पहाटे जुनेद पटेल जेरबंद झाला. मात्र टोळीचे म्होरके गवळी बंधूसह पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार धीरज शर्मा, सद्दाम कुंडले, वृषभ साळोखे- मगरचा पोलिसांना थांगपत्ता लागत नव्हता.
टोळीच्या म्होरक्यासह साथीदारांच्या शोधासाठी पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच दुपारी साडेबाराला पोलिस कॉन्स्टेंबल विजय तळसकर,सुभाष सावर्डेकर, रणजित पाटील यांना खबर्याकडून माहिती मिळाली की,म्होरक्या आदित्य गवळी सीपीआर चौकाजवळ साथीदारांच्या प्रतिक्षेत थांबला आहे. पोलिसांनी क्षणाचीही विलंब न करता चौकात धाव घेतली. यावेळी पोलिसांच्या हालचाली पाहून संशयित आदित्य तेथून निसटला.
तोंडावर रूमाल धरून त्याने कसबा बावडा रोडवरील बार गाठला. एका कोपर्यात बसून त्याने आर्डर दिली. मारेकरी चौकातून निसटल्याने पाठलाग करणार्या पोालिसांची तारांबळ उडाली. सीपीआर हास्पिटल चौकाच्या चारही बाजूला वाट काढत पोलिस म्होरक्याला शोधू लागले. विजय तळसकर, सावर्डेकर कसबा बावडा दिशेने दुचाकीवरून निघाले. मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीतील पेट्रोल संपले. काही अंतर दुचाकी ढकलत त्यानी पेट्रोलपंप गाठले. पेट्रोल घेतले, पण मारेकरी निसटला या भावनेने दोघांनी कपाळावर हात मारून घेतला.
जाता-जाता बारमध्ये डोकावू, असे त्याच्यात ठरले. दोघेही बारमध्ये गेले. वर्दळ कमी होती. बाहेर पडत असतानाच तळसकर यांना शंकेची पाल चुकचुकली. कोपर्यात एक तरूण तोंड लपवून दारूचा घोट घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्या तोंडावरील रूमाल काढताच मुख्य म्होरक्या आदित्य गवळी असल्याचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सहकारी पोलिसांना पाचारण करून त्याला बेड्या ठोकल्या.
मुळचा परप्रांतीय पण पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुंड म्हणून ओळखला जाणारा धिरज चौधरी उत्तरप्रदेशला जाण्याच्या बेतात होता. कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील हेर्ले (ता. हातकणंगले) येथील एका बारजवळ त्याचा वावर असल्याची माहिती मिळाली. साध्या वेशातील पोलिसांचे पथक पोहोचले. त्यास ताब्यात घेण्यात आले. सद्दाम कुंडले सोमवारी पहाटे कुटुंबियांना भेटण्यासाठी बी.डी.कॉलनीतील घराकडे आला होता. पाळतीवर असलेल्या पथकाने त्याच्या घरातच मुसक्या आवळल्या. संशयिताना जेरबंद करण्यासाठीअमित जाधव,सुजय दावणे, योगेश लोकरे, योगेश शिंदे,विजय पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले.