कोल्हापूर : ‘घबाडकुंड’च्या टीमने बुधवारी दै. ‘पुढारी’ला भेट दिली. यावेळी प्राजक्ता हनमघर, संदीप पाठक, देवदत्त नागे, वैष्णवी कल्याणकर, निर्माते रसिक कदम, स्मिता पायघुडे-अंजुटे. (छाया : पप्पू अत्तार) 
कोल्हापूर

Ghabadkund Movie : रहस्यांच्या गर्दीत माणुसकीचा शोध घेणारा ‘घबाडकुंड’

दै. ‘पुढारी’शी कलाकारांचा खास संवाद; मराठीतील पहिलाच सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट १९ जूनला प्रदर्शित

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : एखादे रहस्य वर्षानुवर्षे दडून राहिले, तर त्यामागे नेमके काय लपलेले असते? सत्य, की भीती? आणि त्या रहस्याचा माग काढताना माणूस स्वतःलाच हरवून बसतो की स्वतःला नव्याने शोधतो? अशाच अनेक प्रश्नांची उत्कंठावर्धक उकल करणारा ‘घबाडकुंड’ हा चित्रपट कलाकार म्हणून आत्मभान देणारा अनुभव होता, अशा शब्दांत या चित्रपटातील कलाकारांनी दैनिक ‘पुढारी’ला दिलेल्या खास भेटीत संवाद साधला. मराठीत पहिल्यांदाच एका रहस्यमय ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची संकल्पना साकारत असलेला हा चित्रपट थरारासोबतच माणुसकी, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णयांचे महत्त्व अधोरेखित करतो. १९ जून रोजी ‘घबाडकुंड’ मराठीसह विविध दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे निर्माते रसिक कदम म्हणाले, ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटातील नावाडी दिल्या या व्यक्तीरेखेच्या नव्या पैलूचा धागा पकडून कथा गूढ ठिकाणाभोवती फिरते. दिल्या ही भूमिका साकारणारा अभिनेता संदीप पाठक म्हणाला, माणुसकी, सत्य आणि योग्य निर्णयांचे महत्त्व असा संदेशही हा चित्रपट देतो. आयुष्यात कितीही निखारा असला, तरी तुळशीसारखा संयमी पवित्र भाव अंगी रुजवला पाहिजे हा कथेचा गाभा आहे.

देवदत्त नागे म्हणाला, खंगरी हे पात्रही त्याचे ध्येय कसे गाठतो याचा रंजक प्रवास मी अभिनयातून रेखाटला आहे. सोनी म्हणजे दिल्याची पत्नी हे पात्र रेखाटणारी प्राजक्ता हनमघर म्हणाली, अतिमोहाच्या परिणामांचे चटके हा चित्रपट दाखवतो. मालकीण नावाची भूमिका साकारणारी वैष्णवी कल्याणकर म्हणाली, आई होतानाच्या भावना, बाळासाठी आईचे धारिष्ट्य अशा छटा या भूमिकेला आहेत. रंगी या पात्रातील स्मिता पायघुडे - अंजुटे म्हणाली, अनेक भावनांनी भरलेलं पण परिस्थितीनुसार भावनांची बदलाची साक्ष देणारा भूमिकेचा बाज आहे.

सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणजे काय?

एकाच काल्पनिक विश्वात घडणाऱ्या अनेक कथा, व्यक्तीरेखा यांचे परस्परसंबंध असलेले जाळे, एकाच चित्रपटाच्या कथाविश्वात एकत्र आणणारा प्रयोग, या अर्थाने ‘घबाडकुंड’ हा मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरला आहे.

चित्रपटगृहातच पाहा

घबाडकुंड या सिनेमातील भव्य सेट, आवाजाचा दर्जा, तांत्रिक इफेक्ट, साहसी दृश्य, थरारक प्रसंग अनुभव घ्यायचा असेल, तर हा चित्रपट चित्रपटगृहातच पाहा, असे आवाहन संपूर्ण टीमने केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT