डॉ. प्रतापसिंह जाधव
मुख्य संपादक, दै. ‘पुढारी’
महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण, राजकारण, समाजकारण या क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी आमदार, त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील तथा डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. कोल्हापूर जवळील अंबप या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांना अख्खा महाराष्ट्र ‘दादा’ म्हणून ओळखत होता. शैक्षणिक क्षेत्रातील खऱ्या अर्थाने ते ‘दादा’ होते. त्यांनी जिद्द, सचोटी, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या साहाय्याने केलेले कार्य अशक्यप्राय वाटावे, असे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात ४०-५० वर्षांपूर्वीचे चित्र फार वेगळे होते. व्यावसायिक शिक्षण, उच्च शिक्षणात ब्राह्मण समाजाची मक्तेदारी निर्माण झाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकऱ्यांची मुले किंवा सामान्य कुटुंबातील होतकरू युवक-युवतींसाठी डॉक्टर, अभियंता किंवा व्यवस्थापन क्षेत्रांत शिक्षण घेणे हे स्वप्नच मानले जात असे. अशा काळात डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांनी भविष्यातील भारताचे चित्र डोळ्यांसमोर ठेवले. आर्थिक परिस्थिती किंवा भौगोलिक अंतर हे गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आड येऊ नये, या दृष्टीने विविध शिक्षण-उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांची उभारणी करून शिक्षणाच्या लोकशाहीकरणाला गतिमानता दिली. त्यांच्या देहावसानाने एका ऋषितुल्य शिक्षणमहर्षींचे महानिर्वाण झालेले आहे.
बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण आणले. असे धोरण आणणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. त्याची कास धरत डी. वाय. पाटील, पतंगराव कदम यांसारख्यांनी महाविद्यालये आणि शिक्षण संस्था उभारल्या. कोल्हापूर आणि मुंबईमध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभारली. त्यानंतर त्यांनी मोठी झेप घेतली. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, दंतवैद्यक, कृषी, व्यवस्थापन, हॉटेल व्यवस्थापन, जैवतंत्रज्ञान, नर्सिंग, फार्मसी, वास्तुकला, ललित कला आणि इतर अनेक शाखांतील उच्च शिक्षण संस्थांची उभारणी केली. या प्रत्येक संस्थेचा उद्देश केवळ पदवी देणे हा नव्हता, तर विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान, आधुनिक कौशल्ये देणे हा होता. आजघडीला देशात त्यांची ७ विद्यापीठे दिमाखात उभी आहेत.
डॉ. डी. वाय. पाटील (दादा) शिक्षणाच्या क्षेत्राकडे वळण्याआधी राजकारणात सक्रिय होते. ते आणि श्रीपतराव बोंद्रे हे आबांचे तथा पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांचे कार्यकर्ते होते. बहुजन समाजातील मुले समाजकारण, राजकारणात पुढे यावीत, या उद्देशाने आबांनी त्यांना पुढे आणले आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उभे केले. नंतरच्या काळात आबांनी प्रयत्न करून त्यांना पन्हाळा-गगनबावडा मतदारसंघातून आमदारकीसाठी उभे केले आणि श्रीपतराव बोंद्रे यांना करवीर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे केले. गगनबावडा हे आबांचे गाव. बाबा सावंत यांचे वडील पी. बी. सावंत हे तेव्हा तेथील आमदार होते. मतदारसंघातील लोकांची मागणी स्थानिक उमेदवारच असावा, अशी होती; पण आबांनी डी.वाय. दादा यांच्यासाठी अनेक सभा घेतल्या, ‘स्वतः प्रचार केला. मीच उभा राहिलो आहे, असे समजा’, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे डी.वाय. दादा निवडून आले. १९६७ आणि ७२ अशा दोन्ही वर्षी ते निवडून आले; पण पुढच्या खेपेला १९७८ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर डी.वाय. दादा राजकारणापासून काहीसे लांब गेले. श्री. म्हादबा पाटील महाराजांनी त्यांना राजकारणात न जाता शिक्षणाच्या क्षेत्रात जा, असा उपदेश केला. तो डी.वाय. यांनी शिरोधार्ह मानला आणि ते राजकारणापासून दूर गेले आणि स्वतःला शैक्षणिक कार्यात झोकून दिले.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व कार्यामुळे समाजात त्यांना मोठा सन्मान लाभला. त्यांची प्रशासकीय क्षमता, समतोल विचारसरणी आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या. त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून अत्यंत सन्मानाने कार्य केले. राज्यपालपदासारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असतानाही त्यांनी स्वतःला केवळ प्रशासक म्हणून मर्यादित ठेवले नाही. ते शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि लोकांशी संवाद साधणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून कायम सक्रिय राहिले. राजभवनातील औपचारिक वातावरणातही ते विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधत असत. उच्च शिक्षणाची गुणवत्ता, संशोधनाची गरज, ग्रामीण विकास, युवकांचे सक्षमीकरण आणि समाजकल्याण या विषयांवर त्यांचे विशेष लक्ष असे. शासन आणि शिक्षण यांचा परस्पर संबंध समाजाच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचा आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. माझे आणि त्यांचे जवळपास साडेसहा दशकांचे स्नेहबंध होते. त्यांचा जन्म १९३५ सालचा आणि माझा १९४५ सालचा. १९६2 सालापासून आमची मैत्री होती. ते माझ्या मोठ्या भावासारखे होते. माझ्या विवाहाच्या वेळी मुंबईला माझ्या अर्धांगिनी गीतादेवी यांना पाहण्यासाठी जायचे होते. तेव्हा पुण्यातील डॉ. भावे यांच्या खासगी विमानातून डी.वाय. दादा आणि मी मुंबईला गेलो होतो. माझ्या लग्नाच्या वेळी ते स्वतः शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांना घेऊन आले. कित्येक वर्षांची आमची मैत्री. प्रत्येक ठिकाणी आमची जोडगोळी दिसायची. अगदी त्यांच्या मुलांच्या लग्नांपासून ते सर्व कार्यक्रमांमध्ये मी त्यांच्यासोबत असायचो. त्यांच्यात आणि माझ्यात एक भावनिक नाते तयार झाले होते. त्यांच्याशी प्रदीर्घ काळ मैत्री असणारा कदाचित मी एकटाच असेन. त्यांच्याच प्रयत्नांमुळे कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्या संमेलनाचा मी कार्याध्यक्ष होतो.
मला एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. मुंबईतील ताज हॉटेलला मी आणि डी.वाय. दादा चाललो होतो. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले वसंतदादा पाटील तेथून बाहेर पडत होते. त्यांनी आधी माझी विचारपूस केली आणि डी.वाय. दादांचीही चौकशी केली. तेव्हा स्पष्टवक्ते आणि सडेतोड असलेले डी.वाय. दादा त्यांना म्हणाले, ‘आम्ही कशाला तुमच्याकडे येणार? आम्ही राजारामबापूंचे कार्यकर्ते. तुम्ही आमची कामे करणार नाही.’ त्यावर वसंतदादा त्यांना ‘येऊन भेट तरी’ असे म्हणाले. त्यानुसार मी आणि डी.वाय. दादा माहीमला वसंतदादांकडे गेलो. वास्तविक, डी.वाय. हे राजारामबापूंचे कार्यकर्ते होते; पण दादा आणि बापूंमध्ये राजकीय स्पर्धा होती. तरीही वसंतदादांनी डी.वाय. दादा यांचे जे काही शैक्षणिक प्रस्ताव होते. अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रस्तावांची पडताळणी केली. झपाझप मंजुरीच्या सह्या केल्या.
डॉ. ना. भि. परुळेकर आणि त्यांच्या पत्नी शांताबाई यांनी १९३२ मध्ये पुणे येथून दै. ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. ज्यावेळी शरद पवार यांनी ‘सकाळ’चे शेअर्स विकत घेतले. ‘सकाळ’च्या मालक लीलाताई परुळेकर यांनी या व्यवहाराला हायकोर्टात चॅलेंज दिले. हायकोर्टाने व्यवहाराला स्थगिती दिली. लीलाताईंना शेअर्स परत करण्याचा आदेश दिला. लीलाताई गुंतवणूकदार शोधत होत्या. हुशार शरद पवारांच्या पुढे त्यांची डाळ शिजली नाही. त्यांना गुंतवणूकदार काही मिळाले नाहीत. पुढे त्या माझ्याकडे आल्या. मी त्यांना शेअर्स घेण्याची तयारी दर्शवली. मी आणि डी.वाय. दादा बंधुतुल्य मित्र असल्यामुळे मी त्यांना ‘सकाळ’चे शेअर्स घेणार असल्याचे सांगून माझ्यासोबत येण्याची विनंती केली. त्यावेळी आम्ही दोघांनी मिळून ‘सकाळ’चे शेअर्स घेतले. परंतु, हे सगळे शरद पवारांना समजल्यांनतर मला भेटायला मुंबईच्या घरी आले. मी त्यांना म्हणालो, ‘या व्यवहारात डी. वाय. पाटील माझ्यासोबत आहेत. यावेळी डी.वाय. माझ्याबरोबर हवेत.’ मग मी आणि शरद पवार ‘पारिख बिल्डिंग’ला डी.वाय. यांना भेटायला गेलो. मी डी. डी. परत घ्यायला तयार नव्हतो; पण डी. वाय. पाटील यांच्या आग्रहाखातर मला ते करावे लागले. कारण, डी. वाय. पाटील दादांना कोल्हापूर आणि मुंबई या दोन ठिकाणी मेडिकल कॉलेजेस पाहिजे होती. डी.वाय. दादांच्या मैत्रीसाठी मी डी.डी. परत घेतला. त्यामुळे ‘सकाळ’ शरद पवारांच्या मालकीचा झाला. मी शरद पवारांना सांगून डी.वाय. दादा यांना आधी कोल्हापूर आणि नंतर मुंबईला मेडिकल कॉलेजेस काढायला परवानगी मिळवून दिली. त्यानंतर डी.वाय. दादांचा शैक्षणिक विस्तार गतिमान झाला. डी. वाय. दादा आणि माझ्यातील मैत्रीचे रूपांतर नात्यात झाले. आमचे सुपुत्र डॉ. योगेश यांचा विवाह डॉ. डी. वाय. पाटील यांची नात डॉ. स्मितादेवी यांच्याशी झाला. डॉ. स्मितादेवी या पुणे येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील व सौ. भागश्री पाटील यांच्या सुकुन्या आहेत. या नात्यामुळे दोन मोठ्या घराण्यांचा संगम झाला. आज डी. वाय. दादा यांच्या जाण्याने पाटील व जाधव दोन्ही कुटुंबीयांची मोठी हानी झाली आहे. ही पोकळी भरून न निघणारी आहे.
डी. वाय. दादा हे औदार्याचे प्रतीक होते. त्यांच्याकडे येणाऱ्या कोणालाही त्यांनी विन्मुख पाठविले नाही. प्रत्येकाला मुक्तहस्ते दान दिले. अडल्यानडल्यांची गरज भागविली म्हणून ते लाखोंचे पोशिंदे ठरले. विविध क्षेत्रांत यशाची शिखरे पादाक्रांत करूनही डी.वाय.नी कोल्हापूरच्या मातीचा विसर कधी पडू दिला नाही. अलीकडच्या काळात कोल्हापूरमध्येच राहत होते. तळसंदे येथील शेतावर नियमितपणाने जाणे हा त्यांचा शिरस्ता होता. डी.वाय. हे देणाऱ्या हाताचे होते. अनेकांच्या जीवनात त्यांनी आपल्या आधाराने इंद्रधनुष्य फुलवले; पण त्याची कधी चर्चा केली नाही. आपल्याला मदत केलेल्यांची जाणीव ठेवणे आणि आपण ज्यांना मदत केली त्याची आठवण विसरून जाणे हे त्यांचे जीवनसूत्र होते.
त्यांनी उभारलेल्या संस्थांना ज्या हातांनी मदत केली त्यांना ते कधीही विसरले नाहीत. ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञताभाव हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य होते आणि त्यामुळेच त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही निरंकारी होता. त्यांची वृत्ती पहिल्यापासूनच आध्यात्मिक होती. साधू-संतांचा सहवास त्यांना सतत साद घालत असे. आपल्या शिक्षणकार्याच्या विस्ताराबरोबरच त्यांच्या आध्यात्मिक वृत्ती एखाद्या कमळासारखी विकसित होत गेली. अध्यात्म हा त्यांच्या अंतरीचा सूर होता. त्यांच्या अंतःकरणातून सदैव ईश्वराचे चिंतन चालू असे. आपल्या अखेरच्या काळात ते अधिकाधिक अध्यात्मात लीन होत गेले. आपल्या कार्याचा सारा भार आपल्या मुलांच्यावर सोपवून ते विरक्तीच्या मार्गाला लागले. आपली चित्तशुद्धी करत राहिले आणि अत्यंत शांतपणे त्यांनी आपल्या अनंताचा प्रवास सुरु केला. शेगावच्या गजानन महाराजांचे ते भक्त होते. डीवाय देहरूपाने आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उभारलेला वटवृक्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रगतीची सावली देत राहील. माझ्या या गुरुबंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली!