कोल्हापूर : भाविकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार्या महाद्वार रोडसह ताराबाई रोड अतिक्रमणाने व्यापला आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत केबिन्स, रस्त्यावरच येणारे फेरीवाले, अस्ताव्यस्त पार्किंगचे अतिक्रमण अशा विविध कारणांनी भाविकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहनधारकांना तारेवरील कसरत करावी लागते तर पादचार्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.
शहरातील प्रमुख रस्ता म्हणून महाद्वार रोड आणि ताराबाई रोडची ओळख आहे. श्री अंबाबाई दर्शनासाठी येणार्या भाविक पर्यटकांना या महाद्वार रोडचे आकर्षण असते. एवढेच नाही तर स्थानिक नागरिकांनाही महाद्वार रोडवर खरेदी आणि फिरणे प्रतिष्ठेचे वाटते. त्यामुळे या दोन्ही मार्गावर नेहमी भाविक नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या दुप्पट वाढते. महाद्वार रोडवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या आहे. हातगाडीवर कपडे विकणारे, सौंदर्यप्रसाधने विकणारे, स्टॉल लावणारे, विविध किरकोळ वस्तूंची विक्री करणार्या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच या ठिकाणी जोतिबा रोड कॉर्नर महाद्वार या ठिकाणी अनधिकृत रिक्षा थांबतात. तसेच खरेदीसाठी येणार्यांची वाहने थेट रस्त्यावर अतिक्रमण करून लावली जातात. त्यामुळे येणार्या- जाणार्याना या अतिक्रमणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. वाहनधारकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. पादचार्यांना वाहने चुकविताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अशीच स्थिती ताराबाई रोडवर आहे. येथे दुतर्फा अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा होतो. नागरिकांना धड चालताही येत नाही अशी स्थिती या मार्गावर होते. विशेषत: कपिलतीर्थ मार्केटचे प्रवेशद्वार व महाद्वार चौक या दोन्ही ठिकाणी पादचार्यांना रस्ताही मिळत नाही. वाहनांची रेलचेल व अतिक्रमणामुळे पादचार्यांना या ठिकाणी जाताना अक्षरश: घाम फुटतो.
दोन्ही रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करणार्यांकडून आपले स्टॉल थेट रस्त्यावर मांडले जातात. अतिक्रमण निर्मूलन पथकाची गाडी येताच पळापळ होते. हे पथक निघून जाताच पुन्हा रस्त्यावर ठाण मांडतात, अशी स्थिती अनेकवेळा अनुभवायला मिळते.