रेंदाळ : हुपरी (ता. हातकणंगले) येथील अतिक्रमण करून बांधण्यात आलेले मदरशाचे बांधकाम प्रचंड पोलिस बंदोबस्तात नगरपालिकेने शनिवारी पहाटेपासून हटवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुस्लिम समाजाने शांततेच्या मार्गाने विरोध केला; पण अतिक्रमण काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. अतिक्रमण परिसर सील करण्यात आला असून, संचारबंदी लागू करण्यात आली होती.
हुपरी येथील सरकार गायरान भूमी गट क्रमांक 844/अ/1 पैकी मालमत्ता क्रमांक 4489 च्या मिळकतीवर सुन्नत जमियतच्या बांधकामासंदर्भात हुपरी नगरपालिकेने 12 डिसेंबर रोजी अंतिम नोटीस दिली होती. अतिक्रमण काढून घ्यावे; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी नोटिसीत म्हटले होते. नोटिसीची मुदत 28 डिसेंबरपर्यंत होती. या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम काढावे, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केली होती. त्यासाठी 23 सप्टेंबरपासून उपोषण व विविध आंदोलने करण्यात आली होती. नगरपालिका कार्यालयासमोर समितीचे नितीन काकडे, शिवसेनेचे राजेंद्र पाटील, बजरंग दलाचे प्रशांत साळोखे, प्रताप भोसले हे उपोषणास बसले होते; तर गावबंदही करण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिकेने वीज कनेक्शन तोडून या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर मुस्लिम समाजाने याबाबत इचलकरंजी न्यायालयात दावा केला होता; मात्र हा दावा न्यायालयाने फेटाळला.
सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामावार कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन जाहीर केले. त्यावर 10 डिसेंबर रोजी समाजाने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. याबाबतच्या कागदपत्रांची मागणी त्यांनी नगरपालिकेकडे केली होती. याबाबत वक्फ बोर्डाकडे दावा दाखल केल्याचे म्हटले होते. त्यानंतर 12 डिसेंबरला पुन्हा नगरपालिकेने अंतिम नोटीस बजावली. त्याची मुदत संपल्यामुळे या वादग्रस्तप्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर नगरपालिकने शनिवारी (दि. 11) पहाटेपासून अनधिकृत मदरशाचे बांधकाम हटवण्याची मोहीम हाती घेतली. सकाळी मुस्लिम समाजाने या कारवाईस शांततेत विरोध केला. समाजातील काही नागरिक रस्त्यावर आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे फोटो हातात घेऊन या कारवाईला विरोध केला. मात्र, अतिक्रमण हटवण्याचे कामकाज सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. या ठिकाणी अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी, प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, अपर तहसीलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे दिवसभर ठाण मांडून होते.