कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश सोमवारी सकाळी मार्केटयार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर दर्शनासाठी ठेवण्यात आला. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, ही गर्दी घोषणांनी किंवा गोंगाटाने भरलेली नव्हती; वातावरण पूर्णतः गंभीर आणि शोकमग्न होते. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. काहीजणांना तर अस्थिकलशाचे दर्शन घेताना भावना अनावर झाल्याने अश्रू आवरता येत नव्हते. अशा भावनिक वातावरणात दर्शन घेतल्यानंतर अस्थिकलश विसर्जनासाठी प्रयाग चिखली येथील संगमावर नेण्यात आला.
अजित पवार यांचा अस्थिकलश राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी सोमवारी सकाळी कोल्हापुरातील मार्केट यार्डमधील पक्षाच्या कार्यलयासमोर सकाळी साडेनऊ वाजता घेऊन पोहोचले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अस्थिकलश स्वीकारत त्याचे पूजन केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेली भजने, अजित पवार यांचे एआयवरील व्हायरल होत असलेले भाषण यामुळे वातावरण गंभीर होते. हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, डॉ. नंदाताई बाभुळकर, मानसिंग गायकवाड यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांची दर्शनासाठी रांग लागली. कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. परंतु कुठेही गडबड, गोंधळ नव्हता. संपूर्ण कार्यालयाचा परिसर शांत होता.
दिवसभरात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, कागलच्या नगराध्यक्षा सविता माने, नगरसेविका माधवी गवंडी, अॅड. मानसी लोळगे, नगरसेवक नियाज खान, राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्ष रेखा आवळे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी भजन लावण्यात आले होते. अधून, मधून ए. आय. वर तयार केलेले अजित पवार यांचे भाषण लावले जात होते. ‘इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मलाबी अजित पवार म्हणतात....,’ हे शब्द कानावर पडताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. महिला कार्यकर्त्यांना तर हुंदका आवरत नव्हता.
प्रयाग चिखली येथील संगमावर दुपारी अस्थिकलश विधिवत विसर्जित करण्यात आला. शांततेत, डोळ्यांत अश्रू आणि मनात आठवणी घेऊन कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. संगमाचा परिसर देखील क्षणभर स्तब्ध झाला.
अजित पवार यांच्याशी मुश्रीफांचे असलेल्या दीर्घ राजकीय आणि वैयक्तिक संबंधामुळे अजून ते स्वत:ला सावरू शकले नसल्याचे त्यांच्या चेहर्यावरून दिसत होते. डोळ्यांतील अश्रू, भरलेला आवाज आणि शब्द न फुटणारी व्यथा या सगळ्यातूनच त्यांचे दुःख व्यक्त होत होते.