कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सेमीकंडक्टरसह उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे युग वेगाने विस्तारत आहे. विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत, कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करीत स्वत:ला सक्षम बनवावे, असे आवाहन राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी केले. शुक्रवारी (दि. २७) शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग उपस्थित होते.
राज्यपाल वर्मा म्हणाले, कोल्हापूरच्या जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे दूरदर्शी नेतृत्वही महत्त्वपूर्ण आहे. नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीने शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडून येत आहे. रोबोटिक्स, स्वयंचलन, क्वांटम तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान ही क्षेत्रे उद्योगविश्व, रोजगार व समाज व्यवस्थेचे स्वरूप बदलत आहेत. या बदलांमुळे आव्हाने निर्माण होत असली, तरी नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतांसोबतच तिच्या मर्यादा व नैतिक परिणामही समजून घेतले पाहिजेत.
विद्यार्थ्यांनी ज्ञान वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित न ठेवता समाजसेवा, राष्ट्रबांधणी व इतरांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी वापरावे, असे आवाहन करत वर्मा म्हणाले, २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल. त्यावेळी आजचे पदवीधर आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यावर असतील. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानातील आव्हानांचे संधीत रूपांतर करून या राष्ट्रीय परिवर्तनाचे साक्षीदार न राहता सक्रिय शिल्पकार व्हावे.