कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थींनी एल्गार पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. परीक्षेतील गैरकारभाराबाबत संताप व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी’चे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या राजीनाम्याची मागणी केली.
‘एमपीएससी’ परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणामुळे संतप्त परीक्षार्थींनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळ्या फिती लावून मोर्चा काढला. स्पर्धा परीक्षा कृती समितीच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून वाजत-गाजत सुरुवात झाली. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या प्रतिमा, संविधानाची प्रस्ताविका हातात घेऊन परीक्षार्थींनी ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे’, ‘पेपरफुटीची साखळी तोडा, एमपीएससी पेपरफुटीत पारदर्शक आणा’, अशा घोषणा दिल्या. मोर्चात मुलींचा सहभाग लक्षणीय होता.
मोर्चा दसरा चौक-व्हिनस कॉर्नर- बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. याप्रसंगी परीक्षार्थींनी संवेदनशीलता दाखवत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. सभेत अनेक परीक्षार्थींनी भावना व्यक्त केल्या. अनेक वर्षे अभ्यास करूनही पेपरफुटी होत असल्याने स्वप्नभंग झाले आहे. श्रीमंतांची मुले येणाऱ्या काळात शिकतील, स्पर्धा परीक्षा देतील. गरिबांनी काय करायचे? असा सवाल गौरी पाटील यांनी केला. ‘एमपीएससी’ पेपरफुटीची मोठी साखळी आहे. यामुळे प्रामाणिक परीक्षार्थींवर अन्याय होत आहे. अध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ऋषीकेश डिसलेने केली. कपिल काळकेकर, राहुल मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनात स्पर्धा परीक्षा कृती समिती प्रमुख श्वेता परुळेकर, शुभम शिरहट्टी, सारिका गुघे, अरुण पाटील, शुभम यादव, साक्षी कुसाळे, शुभम इंदुलकर, ओंकार पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक जॉर्ज क्रूझ, अजिंक्य पाटील सहभागी झाले होते.
कोणी ५० लाख उसने देईल का? ते पोस्ट वाटाय लागलेत...
‘कोणी ५० लाख उसने देईल का? ते पोस्ट वाटाय लागलेत’, ‘पेपरफुटी गुन्हा आहे, त्याला राजकीय आश्रय नको’, ‘आयोगराव, ‘स्किमा’ करायच्या तेवढं बंद करा’, ‘पेपर फोडणारे कोण रे, त्यांना कोल्हापुरी पायताण मारा दोन रे, ‘न्याय द्या देवाभाऊ, लाडक्या बहिणींना न्याय द्या’, ‘पेपरफुटीमुळे आमच्या स्वप्नांचा बळी नको’, अशा फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
काँग्रेस, शिवेसनेसह सामाजिक संघटनांचा आंदोलनास पाठिंबा
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक अमर समर्थ, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजय देवणे, मावळा ग्रुपचे उमेश पोवार, बाबासाहेब देवकर, गिरीश फोंडे यांनी मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला.