अनिल देशमुख
कोल्हापूर : राज्यातील २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तब्बल १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडणार आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणीसाठीची सुरू असलेल्या एसआयआर (विशेष सखोल पुनरीक्षण) प्रक्रियेमुळे निवडणुकीसाठी मतदार यादीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नव्या मतदार यादीनंतरच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, कदाचित निवडणुकांसाठी नवे वर्षही उजाडण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २०२४ व २०२५ व २०२६ मध्ये मुदत संपलेल्या व संपणाऱ्या १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी प्रभाग रचना झाली. यानंतर प्रभाग आरक्षणाचीही प्रक्रिया पूर्ण केली. आरक्षण सोडत, हरकती, दाखल हरकतींवर सुनावणी ही सर्व प्रक्रिया होऊन प्रभाग आरक्षण बुधवारी (दि. ८ जुलै) अंतिम करण्यात आले. शुक्रवारी (दि. १०) ते प्रसिद्ध केले जाणार आहे.
प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या कार्यक्रम घोषित केला जातो. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो, अशी सर्वसाधारण प्रक्रिया आहे. मात्र, राज्यात सध्या मतदार यादी पडताळणीची एसआयआर प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याचा फटका या निवडणुकांना बसला आहे. या निवडणुकांसाठी आता नवी मतदार यादीचा वापर करावा लागणार आहे.
नवी मतदार यादी ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
‘एसआयआर’ प्रक्रियेनंतर राज्यात दि. ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम साधारण महिना ते दीड महिना असेल. यामुळे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार होण्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे.
नव्या मतदार यादीचा आग्रह
राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी मतदार यादी ग्राह्य धरावी, अशी मागणी काही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. एसआयआरमधून मयत, स्थलांतरित यासह अपात्र मतदार वगळले जाणार आहेत. यामुळे नव्या मतदार यादीचा आग्रह धरण्यात आला आहे.