कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदारांना खूश करण्यासाठी इतर विविध क्लृप्त्यांप्रमाणेच ‘खाद्य’ प्रचारामुळे शहरात मटण, चिकन आणि अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. इतर आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात मटण विक्रतीत तिप्पट-चौपट वाढ झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
निवडणुकीची धामधूम सध्या अंतिम टप्प्यात असून, मतदान अवघ्या चार दिवसांवर आले आहे. यामुळे राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. सभा, बैठका आणि प्रचारफेर्यांसोबतच अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांकडून मतदारांसाठी जेवणावळी, भेटवस्तूंची देवाण-घेवाण आणि तालीम मंडळांच्या पाठबळासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच बरोबर जेवणावळींवर भर दिला जात आहे. वाढदिवस, जाऊळ, बारसे, सत्कार समारंभ अशा नावाखाली जेवणावळी सुरू आहेत.
निवडणूक कालावधीत, विशेषतः प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात, सकाळ-संध्याकाळ नाश्ता-चहा आणि दुपार-रात्रीच्या जेवणावळी सर्रास सुरू असतात. यामुळे इतर सामान्य दिवसांच्या तुलनेत मटण, चिकन आणि अंड्यांची विक्री जवळपास दुप्पट ते तिप्पट वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांच्या जेवणावळींसाठी मांसाहाराला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सामान्य दिवसांत मटण व चिकन कोल्हापूर शहरात सरासरी दररोज सुमारे 4 ते 5 टन विक्री होते. निवडणूक काळात हीच विक्री वाढून जवळपास 8 ते 10 टन प्रतिदिन होत आहे, तर दररोज 3 ते 5 लाख अंड्यांची विक्री होत आहे. निवडणूक काळात जेवणावळी आणि कार्यकर्त्यांसाठी नाश्त्यामध्ये अंड्यांचा वापर वाढल्याने मागणी सुमारे 7 ते 8 लाख अंड्यांपर्यंत वाढली आहे. मटणाचा दर 780 रुपये किलो, चिकन 180 ते 300 रुपये किलो तर अंडी दर 7 ते 8 रुपये नग आहे.
अनेक उमेदवारांकडून लोकांचे ग्रुप, महिला मंडळ, मंडळांच्या कार्यकर्त्यांना हॉटेल्सच्या शाकाहारी-मांसाहारी जेवणांचे कुपन दिले जात आहे. तसेच ग्रुपच्या संख्येनुसार घरपोच जेवणाच्या ऑर्डर्स घरगुती जेवण करणार्या लोकांना दिल्या जात आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांबरोबरच घरगुती जेवण घरपोच करणार्या लोकांकडून मटण, चिकन, अंडी यांच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरासह आसपाच्या ग्रामीण भागातून मटण, चिकनची खरेदी केली जात आहे.