₹5 Lakh Jewelry Theft | वृद्धेला कापडी पट्टीने बांधून ५ लाखांच्या दागिन्यांची चोरी  File Photo
कोल्हापूर

₹5 Lakh Jewelry Theft | वृद्धेला कापडी पट्टीने बांधून ५ लाखांच्या दागिन्यांची चोरी

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आत घुसलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी ८० वर्षांच्या वृद्धेला कापडी पट्टीने बांधून, ५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथे घडली. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी : महाडिक वाडी येथील प्राथमिक शिक्षक सरदार बापू महाडिक (वय ५५) यांच्या घरी १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महाडिक यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा होता. याच संधीचा फायदा घेत दोघा चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

घरात असलेल्या महाडिक यांच्या वृद्ध आई इंदुबाई बापू महाडिक (वय ८०) यांच्या तोंडास आणि हातास पांढऱ्या कापडी पट्टीने बांधून चोरट्यांनी त्यांना जागीच अडकवून ठेवले. त्यानंतर इंदुबाई यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या जबरदस्तीने ओढून काढल्या. या झटापटीत त्यांच्या मनगटाला आणि तोंडाला दुखापत होऊन त्या जखमी झाल्या. चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील ४ तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, अर्धा तोळ्याचे मनी मंगळसूत्र आणि अर्धा तोळ्याच्या कानातील कुड्या व बुगडी असा एकूण ५ तोळे वजनाचा व ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. भरदिवसा घडलेल्या या जबरी चोरीच्या प्रकारामुळे महाडिकवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT