Elderly Woman Murder | अत्याचारास प्रतिकार केल्याने वृद्ध महिलेचा खून केल्याचे उघड 
कोल्हापूर

Elderly Woman Murder | अत्याचारास प्रतिकार केल्याने वृद्ध महिलेचा खून केल्याचे उघड

पुढारी वृत्तसेवा

कोतोली : पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिचा निर्घृणपणे खून केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या दोन दिवसांत छडा लावत अंकुश हणमंत पाटील (वय 51, रा. कोलोली) याला अटक केली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

छबुताई सर्जेराव पाटील (वय 50) या 24 मे रोजी आपल्या मासुलकी शेतात पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळ झाली तरी त्या घरी परतल्या नाहीत. वारंवार मोबाईलवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. अखेर नातेवाईकांनी शेतात धाव घेत शोध सुरू केला. शेतात दिसलेले द़ृश्य अंगावर काटा आणणारे होते. छबुताई पाटील रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यांच्या डोके आणि हातावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. हा प्रकार समोर येताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान अंकुश पाटील याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र छबुताई पाटील यांनी प्रतिकार केल्याने संतापलेल्या पाटीलने धारदार शस्त्राने डोक्यावर व हातावर वार करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली. पाटील यास पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संशयिताला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आयुष्यभर कष्ट करून संसार उभा करणार्‍या महिलेचा अशा अमानुष पद्धतीने झालेला अंत गावकर्‍यांच्या जिव्हारी लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT