कोल्हापूर : पाचगाव येथील रायगड कॉलनी परिसरातील 73 वर्षीय वृद्ध महिलेचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. तीन दिवसांपासून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. जिल्ह्यात कोरोना बाधित सहा रुग्ण असून त्यापैकी 3 जणांवर खासगी रुग्णालयात तर तिघेजण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. यात शहरातील पाच व सांगली जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जानेवारी ते एक जूनअखेर जिल्ह्यात कोरोनाचे 12 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
संबंधित महिलेस उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी आणि श्वसन विकाराचा गंभीर आजार असल्याने प्रकृती औषधोपचारास साथ देत नव्हती. प्रकृती अधिकच खालावल्याने व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे मुलगा, सूना, नातवंडे असा परिवार आहे. पंचगंगा स्मशानभूमी येथे महापालिकेच्या कर्मचार्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या वर्षातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.
संबंधित महिलेला थंडी, ताप, खोकला आणि श्वसन विकाराचा त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी 30 मे रोजी सीपीआर येथे दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू होते. पण वाढत्या संसर्गामुळे डॉक्टरांनी स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दोन दिवसांपासून सीपीआरच्या कोरोना कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते.