kolhapur | हरवलेल्या मायेला कोल्हापुरात मिळाला माणुसकीचा आधार 
कोल्हापूर

kolhapur | हरवलेल्या मायेला कोल्हापुरात मिळाला माणुसकीचा आधार

नागालँडहून आलेल्या वृद्धेला तरुणांकडून आश्रय; नातलगांच्या शोधासाठी प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अनोळखी रस्ता, काळोखाची रात्र आणि मनात असंख्य वेदना घेऊन एक वृद्ध महिला कोल्हापुरात येऊन पोहोचली. नागालँडमधून कशी आली, याचा ठावठिकाणा नसलेल्या या महिलेला शहरातील संवेदनशील नागरिकांनी मायेच्या कवेत घेत नवे आयुष्य देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरीही तिचे डोळे आजही शोधत आहेत... आपल्या माणसांचा चेहरा, आपल्या घराचा उंबरठा.

दुधाळी गंगावेस परिसरात ही महिला आढळून आल्यानंतर वाघाची तालीम मंडळातील तरुणांनी तिला मदतीचा हात दिला. भाषेचा अडसर आणि मानसिक अस्थिरता यामुळे संवाद साधणे कठीण होत असतानाही त्यांनी हार मानली नाही. तिच्या डोळ्यांतील असहाय्यता ओळखत त्यांनी तत्काळ देवांश मनुष्य समाजसेवा संस्थेशी संपर्क साधला. तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी कोल्हापूर ते कागल दरम्यान रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. या संपूर्ण प्रवासाचा खर्च तरुणांनी स्वतः उचलत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.

सध्या ही महिला संस्थेत सुरक्षित असून हळूहळू नव्या वातावरणाशी जुळवून घेत आहे. संस्थेतील मायेच्या स्पर्शामुळे तिच्यात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. ती स्वतःची स्वच्छता राखते, वेळेवर आहार घेते आणि इतरांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, तिच्या डोळ्यांत अजूनही आपल्या माणसांच्या शोधाची ओढ कायम आहे. तिच्या नातलगांचा शोध घेण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू असून अद्याप यश आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT