जयसिंगपूर : जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर 29 ऑक्टोबरला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या रेखा सुभाषचंद्र गांधी (वय 71, रा. रेल्वे स्थानक परिसर, जयसिंगपूर) या वृद्ध महिलेचा ‘रेबीज’ने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेने जयसिंगपुरात खळबळ उडाली असून, याच कुत्र्याने बालिकेसह वृद्ध आणि युवकाचाही चावा घेतला आहे.
29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने रेखा गांधी यांच्यावर हल्ला चढविला आणि हाताबरोबरच चेहर्याचे लचके तोडले. त्यानंतर याच कुत्र्याने 7 वर्षीय बालिका आणि एका वृद्धावरही हल्ला केला होता. तसेच, हुसकावण्यासाठी गेलेल्या युवकावरही हल्ला करून जखमी केले होते.
जखमी झालेल्या गांधी यांनी सांगली सिव्हिल रुग्णालयात ‘रेबीज’चे इंजेक्शन घेतले होते; पण त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे गांधी यांना 19 नोव्हेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर ‘रेबीज’ची लक्षणे आढळून आली होती. गुरुवारी पहाटे त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सकाळी उपचारांदरम्यान त्यांचा ‘रेबीज’ने मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र अॅड. नीलेश गांधी यांनी पत्रकारांना दिली.