हुपरी : कडगाव (ता. भुदरगड ) येथील सामाईक शेतीच्या वाटणीच्या कारणावरून हुपरी येथे वास्तव्यास असणार्या चुलत्यावर सख्खे पुतणे व जावयाने कोल्हापूरपासून पाठलाग करत पट्टणकोडोलीपैकी अलाटवाडी येथे तलवारीने भर रस्त्यावर सपासप वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. अब्दुल सत्तार मुल्लाणी (55, रा. वाळवेकरनगर पहिली गल्ली, हुपरी) असे त्यांचे नाव आहे.
या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून गंभीर जखमी मुल्लाणी यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरिफ रफिक मुल्लाणी, अझिम रफिक मुल्लाणी व जावई आरिफ तुरेवाले (सर्व रा. बाईचा पुतळा राजारामपुरी कोल्हापूर) या नातेवाईकांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल मुल्लाणी यांचे यांचा मुलगा हकीम याचे यळगूड रस्त्यावर शिवाजीनगरमध्ये चिकन सेंटर आहे. मुल्लाणी गेल्या 18 वर्षांपासून नोकरी निमित्ताने दुबईमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या व्हिसाची मुदत सहा महिन्यांपूर्वी संपल्याने ते भारतात परतल्यानंतर मुलगा हकीमसोबत येथे वास्तव्यास होते.
मुल्लाणी कुटुंबाची गावाकडे सामाईक शेती आहे. या शेतीच्या वाटणीवरून त्यांच्या कुटुंबात वाद होता. हा वाद सोडविण्यासाठी सोमवारी कोल्हापुरात नातेवाईकाच्या घरी बैठक होती. यामध्ये वाद न मिटता वादावादी झाल्याने तेथून पत्नी व आईसह मुल्लाणी दुचाकीने हुपरीकडे येत होते. यावेळी कोल्हापुरात वास्तव्यास असणार्या त्यांच्या पुतण्यांनी त्यांचा कोल्हापूरपासून पाठलाग करीत अलाटवाडी येथे त्यांना रस्त्यावर अडवून तलवारीने सपासप वार केले. यामध्ये त्यांच्या हातांवर, डोक्यावर व पोटावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यापासून वाचविण्यासाठी पत्नी व आई मध्ये आल्या असता त्यांना ढकलून देऊन शिवीगाळ केली. तसेच आरिफ याने सोन्याची चेन पळवून नेल्याचे मुल्लाणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी गर्दी जमू लागताच हल्लेखोर चारचाकीतून कोल्हापूरकडे पसार झाले. जखमी मुल्लाणी अर्धा तास घटनास्थळी पडून होते. काही वेळाने रुग्णवाहिका आल्यानंतर सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.