kolhapur Crime News | पती-पत्नीच्या वादातून आजीसासूला पेटवले; गंभीर जखमी File Photo
कोल्हापूर

kolhapur Crime News | पती-पत्नीच्या वादातून आजीसासूला पेटवले; गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज : नवरा-बायकोतील भांडणाला जबाबदार असल्याच्‍या रागातून गुरुनाथ शशिकांत शिंदे (वय ३१, रा. चिंचेवाडी, ता. गडहिंग्लज) याने त्याची आजीसासू सुलोचना पुंडलिक कदम (वय ६५, रा. हसूरसासगिरी, ता. गडहिंग्लज) यांना पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. चुलीजवळ असल्याने पेट्रोलचा भडका उडून त्या ४५ टक्के भाजून गंभीर जखमी झाल्या.

याबाबतची माहिती अशी, गुरुनाथ याचे प्रीती हिच्याशी सहा वर्षांपूर्वी लग्‍न झाले होते. आई-वडील नसल्‍याने प्रीती आजीकडेच माहेरासाठी जाणे-येणे करते. गुरुनाथ याचे आई-वडिलांशी पटत नसल्याने तो पत्नीसह वेगळा राहत होता. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. काही महिन्यांपासून या दोघांमध्‍ये किरकोळ कारणातून वाद होत होते. या वादाला आजीसासूच जबाबदार असल्याचे गुरुनाथ याच्या डोक्यात होते. पंधरा दिवसांपूर्वी पती-पत्‍नीत जोरात वाद झाल्याने प्रीती मुलासह आजीकडे राहावयास गेली होती.

गुरुनाथने गुरुवारी (दि. २३) सायंकाळी प्रीतीला फोन करून घरी येण्याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने गुरुनाथला राग आला होता. याच रागातून त्या‍ने शुक्रवारी (दि. २४) सकाळी दहाच्या सुमारास हसूरसासगिरीमध्ये घरी जाऊन सुलोचना कदम यांच्‍या अंगावर पेट्रोल ओतले. त्या‍ भाकरी करत असल्याने चुलीच्या जाळाचा भडका उडाला व त्या भाजून गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांनी फिर्याद दिली असून पुढील उपचारांसाठी कोल्हापूरमध्ये हलविले आहे. पोलिसांनी गुरुनाथला अटक केली असून तपास पोलिस उपनिरीक्षक पल्लवी पवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT