Bee Attack Elderly Farmer Death
कवठेगुलंद : शिरोळ तालुक्यातील बुबनाळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली. नारळाच्या झाडावर असलेले मधमाशांचे मोठे पोळ अचानक तुटून खाली पडले आणि मधमाशांच्या भीषण हल्ल्यात ७८ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे नाव बसप्पा अण्णाप्पा कुमठे असे असून, ते जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी आपल्या शेताकडे गेले होते. शेतातील नारळाच्या झाडावर असलेले मधमाशांचे पोळ अचानक खाली पडल्याने संतप्त मधमाशांनी आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घातला. अचानक झालेल्या या हल्ल्यात शेतात असलेले अनेक जण जीव वाचवण्यासाठी धावत सुटले. मात्र, बसप्पा कुमठे दुर्दैवाने मधमाशांच्या विळख्यात अडकले.
मधमाशांनी त्यांच्या अंगावर अक्षरशः झुंडीने हल्ला केला. गंभीर स्वरूपाचे डंख बसल्यामुळे ते जागेवरच बेशुद्ध पडले. नंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात हलवले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेने बुबनाळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुमठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामीण भागात मधमाशांच्या पोळ्यांमुळे होणाऱ्या अशा अपघातांविषयी ग्रामस्थांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.