El Nino impact | ‘अल निनो’मुळे समुद्रातील माशांची ‘अन्नसाखळी’ संकटात  
कोल्हापूर

El Nino impact | ‘अल निनो’मुळे समुद्रातील माशांची ‘अन्नसाखळी’ संकटात

अपवेलिंग मंदावल्याने फायटोप्लँक्टन घटण्याची शक्यता; बांगडा, तारलीच्या अधिवासातही बदल होण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘अल निनो’चा परिणाम सध्या पावसावर जाणवत असतानाच त्याचे पडसाद समुद्रातील जलचरांवरही उमटण्याची शक्यता आहे. समुद्राचे पाणी तापले की पहिला फटका माशांना नव्हे, तर त्यांच्या अन्नाला बसतो. ‘अल निनो’मुळे थंड आणि पोषकद्रव्यांनी समृद्ध पाणी वर आणणारी अपवेलिंग प्रक्रिया मंदावत असल्याने पोषकद्रव्यांचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे फायटोप्लँक्टनची वाढ घटल्यास झूप्लँक्टनवर परिणाम होऊन पुढे माशांसह सागरी जीवांची अन्नसाखळी संकटात येऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘नासा’च्या उपग्रह निरीक्षणातही ‘अल निनो’च्या काळात मध्य प्रशांतातील क्लोरोफिल ‘ए’चे प्रमाण घटल्याचे संकेत मिळाले आहेत.

‘नासा’च्या पीएसीई उपग्रहाच्या प्रतिमेनुसार जून २०२६ मध्ये अल निनो बळावत असताना क्लोरोफिल ‘ए’चे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी दिसले. समुद्रात तरंगणारे अतिसूक्ष्म, वनस्पतींसारखे जीव म्हणजे फायटोप्लँक्टन. सूर्यप्रकाशाच्या मदतीने ते स्वतःचे अन्न तयार करतात आणि समुद्रातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा आधार मानले जातात. त्यांच्या शरीरातील हिरव्या रंगद्रव्याला ‘क्लोरोफिल ए’ म्हणतात. त्यामुळे समुद्रातील ‘क्लोरोफिल ए’चे प्रमाण हे फायटोप्लँक्टनच्या प्रमाणाचा अंदाज देणारा महत्त्वाचा निर्देशक आहे.

यापूर्वीच्या ‘अल निनो’तही दिसलेत परिणाम

१) १९९७-९८ च्या तीव्र ‘अल निनो’मध्ये पश्चिम किनाऱ्यावर समुद्राचे तापमान वाढून किनारी अपवेलिंग कमकुवत झाले.

२) कर्नाटक किनाऱ्यावर, विशेषतः मंगळूर परिसरातील पेलॅजिक मत्स्यसंपत्तीवर त्याचा मोठा परिणाम झाला.

‘अल निनो’च्या काळात समुद्राचे पृष्ठभागीय पाणी उबदार होऊन वारे कमजोर पडल्यास अपवेलिंगची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे खोल समुद्रातील थंड आणि पोषकद्रव्यांनी समृद्ध पाणी पृष्ठभागावर येण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, फायटोप्लँक्टनची वाढ घटू शकते आणि त्यावर अवलंबून असलेल्या झूप्लँक्टनलाही पुरेसे अन्न मिळत नाही. झूप्लँक्टन कमी झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या लहान माशांच्या अन्नपुरवठ्यावर परिणाम होतो. अशा प्रकारे ‘अल निनो’चा परिणाम समुद्रातील अन्नसाखळीच्या एका टप्प्यावर न थांबता पुढच्या टप्प्यांपर्यंत पोहोचू शकतो.
प्रा. डॉ. प्रीती परेरा, प्राणिशास्त्रज्ञ व सागरी जीवसृष्टी अभ्यासक, गोवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT