संजीव खाडे
कोल्हापूर : मान्सूनच्या पावसाने दिलेली ओढ आणि ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्रावर तीव्र जलसंकटाचे सावट निर्माण झाले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने (जीएसडीए) ३० सप्टेंबर रोजी घेतलेल्या नोंदींनुसार, राज्यातील भूजल पातळीत सरासरी १ ते ३ मीटरने घसरण झाली आहे. ही स्थिती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील कोकण भागापासून ते मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील भूजल साठे कमालीचे आटले आहेत.
भूजलसाठ्यांमध्ये झालेली ही घट आगामी उन्हाळ्यात राज्यासाठी भीषण पाणीटंचाईचे आणि ‘वॉटर आणीबाणी’चे संकेत देत असल्याचे मत पर्यावरण आणि जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने संभाव्य जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये वनराई बंधारे आणि सिमेंट नाला बांधणीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. उपलब्ध साठ्यातील पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. शेती आणि औद्योगिक पाण्याच्या वापरासंदर्भात फेरनियोजन करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी १.६ मीटरने घट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी भूजल पातळी १ मीटर ६ सें.मी.ने (१०६ सें.मी.) खालावली आहे. मालवण तालुक्यात सरासरीच्या तुलनेत २ मीटर २४ सें.मी.ने पाणी खाली गेले असून, सध्याची पातळी ४.२६ मीटरवर पोहोचली आहे. कणकवलीत १.५ मीटर, तर देवगडमध्ये १.३२ मीटरने, वेंगुर्लेत सर्वाधिक ५.३३ मीटरवर (१.६३ मीटरने घट) पाणी गेले आहे. तथापि, एकमेव वैभववाडी तालुक्यात भूजल पातळी सरासरीपेक्षा १२ सें.मी.ने सुधारली आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील सागरी किनारपट्टीच्या भागांत भूजल पातळी ०.८० ते १.२० मीटरने खालावली आहे.
मराठवाडा विभाग ‘वॉटर इमर्जन्सी’ची स्थिती
राज्यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती मराठवाड्याची आहे. विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) ऑक्टोबर महिन्यातच कोरड्या पडू लागल्या आहेत.
उत्तर, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातही घट
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये भूजल साठे १.८ मीटरने, तर अहिल्यानगरच्या भागात १.५ मीटरने खोल गेले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे जिल्ह्यात भूजल पातळीत १.२ ते २.० मीटरची घट झाली आहे. पूर्व व पश्चिम विदर्भातील मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या क्षेत्रात भूजल पातळी ०.७५ ते १.५ मीटरने घसरली आहे.
डोंगरावरून वाहणार्या पाण्याची साठवूक करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. शेणखताचा घटलेला वापर आणि रासायनिक खते जी पाणी शोषत नाही, त्याचा वाढता वापर याचा परिणाम भूजल पातळी खालावण्यावर होत आहे. यासाठी वनक्षेत्र, वनराई वाढण्यासाठी वृक्षलागवड करावी लागेल. झुडूप, जंगले वाढवावी लागतील. वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी बंधारे बांधावे लागतील. हे काम सरकार आणि नागरिकांच्या सहकार्यानेच होऊ शकते.मधुकर बाचुळकर, पर्यावरण अभ्यासक